* जंगल भ्रमंतीसाठी नोंदणीची सोय
* विविध विभागांची माहिती
राज्याचे वनखाते अद्ययावत होत असतानाच संकेतस्थळानेसुद्धा कात टाकली आहे. नवीन रूपातील वनखात्याचे संकेतस्थळ चक्क मराठीत झाले आहे. वनखात्याचे विविध विभागसुद्धा आता याच संकेतस्थळावर एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे व्याघ्रप्रकल्प, अभयारण्याच्या भटकंतीसाठी पर्यटकांना इतर संकेतस्थळावर जाण्याची गरज नाही. या संकेतस्थळावर वनखात्याच्या माहितीसह सफारीकरिता नोंदणीची व्यवस्थाही आहे.
विविध संकेतस्थळाच्या पुनर्विलोकनासाठी ‘आयटी’ तज्ज्ञ व माजी लोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने विविध संकेतस्थळांची पाहणी केली. वनखात्याच्या संकेतस्थळातही अनेक त्रुटी असल्याचे त्यांना जाणवले. संकेतस्थळासंदर्भात असणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वाअंतर्गत सुमारे १२० मुद्दे संकेतस्थळात परिपूर्ण होणे आवश्यक आहे. वनखात्याच्या जुन्या संकेतस्थळात यातील केवळ ५० मुद्देच अस्तित्त्वात होते. त्यामुळे सर्वप्रथम इंग्रजीत असणारे हे संकेतस्थळ मराठीत करण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसार मार्च २०१६ मध्येच संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू झाले. संकेतस्थळ अद्याप परिपूर्ण झालेले नाही, पण मराठीतील आणि हिरव्यागार संकेतस्थळाला नागरिकांची पसंती मिळू लागली आहे. समितीने सुचविलेल्या सुधारणानुसार वनखात्यांतर्गत येणारे सर्व विभाग याच संकेतस्थळावर आणले गेले आहे. पर्यटकांना आजपर्यंत जंगल भ्रमंतीसाठी इतर संकेतस्थळाची वाट पकडावी लागत होती. आता मात्र याच संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर त्याची लिंक देण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण, जैवविविधता आणि वनविकास महामंडळाच्या लिंकसुद्धा वनखात्याच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर आहेत. आजपर्यंत वनखात्याशी संबंधित सर्व बातम्या एकत्र देण्यात येत होत्या. विभागीय आणि वनवृत्त कार्यालय असे बातम्यांचे दोन विभाग करण्यात आले आहेत. संवर्धन, उत्पादन, संरक्षण, व्यवस्थापन, जैवविविधता, वन्यजीव, वनवृत्त कार्यालये, सार्वजनिक संवाद या वनखात्यातील कार्यकक्षांची विस्तृत माहिती यात उपलब्ध आहे. वने, वन्यजीव तसेच वनखात्याशी संबंधित छायाचित्रांचे दालनही प्रेक्षणीय आहे. विशेष म्हणजे ही सर्व माहिती मराठीत आणि एका क्लिकवर उघडणारी आहे. भ्रमणध्वनीवर हे संकेतस्थळ उघडल्यानंतर अतिशय स्पष्टपणे ते वाचता येते. नागरिकांना वनखात्याकडून दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा यात आहेत.

संकेतस्थळ मार्गदर्शक तत्त्वांमधील सुमारे ८५ ते ९० मुद्दय़ांची परिपूर्ती वनखात्याच्या या अद्ययावत संकेतस्थळाने केली आहे. उर्वरित मुद्दय़ांची पूर्तीही हे संकेतस्थळ लवकरच करेल. संकेतस्थळ सर्वदृष्टीकोनातून परिपूर्ण नाही, पण ते परिपूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या एक-दोन महिन्यात वनखात्याचे पूर्णपणे मराठीत असलेले अद्ययावत संकेतस्थळ नागरिकांसमोर येईल, असा विश्वास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती, तंत्रज्ञान व योजना) डॉ. प्रवीण श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.