अस्तित्वात असलेल्या यंत्रणांना आव्हान देण्याची प्रक्रिया म्हणजे संशोधन आहे. याच संशोधनावर अवलंबून असणाऱ्या अनेक गोष्टींपैकी अर्थव्यवस्था ही एक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, हवामानबदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. नागपुरातील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) सुरू झालेल्या ‘संशोधन: पुनरुत्थानासाठी’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘शिक्षणातील संशोधन आणि नवोन्मेष’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य व सत्यवान मेश्राम होते. नाविन्यता आणि कल्पकतेवर आधारित समाजच प्रगत देश घडवू शकतो. चौकसबुद्धी हा संशोधनवृत्तीचा गाभा आहे. त्यामुळे आपली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांची चौकसबुद्धी नष्ट तर करत नाही ना, याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. संशोधकांमध्ये प्रचलित व्यवस्थेला आव्हान देणारी एक बंडखोरी आणि संशोधनाची तीव्र ओढ असण्याची गरज असते. यावेळी त्यांनी अंदमान येथे पक्ष्यांवर संशोधन करण्यासाठी गेलेल्या कोल्हापुरातील एका मुलीची कथा सांगितली.
परिस्थिती अनुकुल नसतानाही या संशोधक मुलीने तब्बल १२ तास एकाच पक्ष्यावर लक्ष केंद्रित केले. ही चिकाटी आणि जिद्द संशोधकांमध्ये हवी. अम्युर फाल्कन या मंगोलियातील पक्ष्याचे उदाहरणही त्यांनी दिले. १६० ग्रॅम वजनाचा हा पक्षी सुमारे १६० तास सतत उड्डाण करून स्थलांतर करतो आणि पिलांना जन्म घालतो. प्रस्थापित ज्ञानव्यवस्थेत महत्त्वाची भर घालणारेच खरे संशोधन समजले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने संशोधनक्षेत्राचीही गती वाढवली असून गेल्या एक हजार वर्षांंपेक्षा, गेल्या शंभर वर्षांत अधिक वेगाने संशोधन झाले, असे जावडेकर म्हणाले.

लोकसहभागातून आदान-प्रदानाची गरज -चितळे
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे यांचेही पहिल्या सत्रात ‘शैक्षणिक संशोधनात समाजाचा सहभाग’ या विषयावर भाषण झाले. पर्यावरण, परिसंस्था या विषयीच्या संशोधनात निरीक्षण-विज्ञान आणि पर्यावरणविषयक संशोधन यांची सांगड घालण्यासाठी लोकांना सहभागी करून घेऊन आदान-प्रदानासाठी संघटित रचना उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. माधव चितळे यांनी केले.