नानाभाऊ एंबडवारांची खडसून टीका

‘‘अध्र्यामुध्र्या सत्तेने कामे करता येत नाहीत तेव्हा सत्तेत राहण्यापेक्षा विरोधातच तुम्ही शोभता, तुमचा यापूर्वीचा साडेचार वर्षांच्या सत्तेतील खंडणी वसुलीचा कार्यक्रम आठवा आणि राज्यासाठी कोणते एखादे चांगले काम केले, याचे स्मरण करा, तुमच्या दोन मुख्यमंत्र्यांच्या सरकारातील नितीन गडकरी वगळता एका तरी मंत्र्यांचे उल्लेखनीय काम दाखवा’’ अशा कानपिचक्या देत संतप्त सवालही ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नानाभाऊ एंबडवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.

फॉरवर्ड ब्लॉक ते इंदिरा काँग्रेस, असा राजकीय प्रवास करीत जिल्हा परिषद सदस्य ते कृषी आणि वनमंत्र्यांपर्यंत आणि विविध शासकीय समित्यांच्या उच्च पदापर्यंत मजल गाठलेल्या ८२ वर्षीय नानाभाऊंनी उध्दव ठाकरे यांच्या विधानांचा चांगलाच समाचार येथे घेतला. उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत ‘सुवर्ण महोत्सवी शिवसेना -पन्नास वर्षांची घोडदौड’ या हर्ष प्रधान आणि विजय सामंत लिखित पुस्तकाचे प्रकाशन केले, त्यावेळी शिवसेनेच्या भूमिकेविषयी जे मतप्रदर्शन केले त्याची ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगून म्हटले की, उध्दव ठाकरेंना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही. जेव्हा शिवसेना रांगत होती त्यावेळी कांॅग्रेसने शिवसेनेला बळ दिले. रामराव आदीक यांचा सिंहाचा वाटा शिवसेनेच्या स्थापनेत आहे.

शिवसेना जेव्हा प्रचंड संकटात होती तेव्हा विदर्भातून जांबुवंतराव धोटे बाळासाहेब ठाकरेंच्या मदतीला धावले होते. विदर्भाचा सिंह मुंबईच्या वाघाच्या मदतीला आला आहे. आता या वाघाचे कोणी काही बिघडू शकत नाही, असे ठाकरे म्हणाले होते. १९९५ मध्ये सत्तेत आलेल्या शिवसेनेने खंडणी वसुलीच्या गोरखधंद्याला खतपाणी दिले. शिवसेनेचा जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या सेवकांचे थाट गर्भश्रीमंतांना लाजवणारे होता. छगन भुजबळ शिवसेनेत होते तेव्हा त्यांनी हुतात्मा चौक गोमूत्राने धुतला तो प्रसंग आठवा, शेतकऱ्यांचा कळवळा असलेल्या शिवसेनेने तेव्हा पीकनुकसान भरपाईपोटी फक्त २५० कोटी रुपये दिले होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यात दहा ते साठ रुपयांपर्यंत पेसे जमा झाले होते, ते दिवस आठवा. मी स्वत: या प्रश्नावर बाळासाहेब ठाकरेंना भेटून शेतकऱ्यांची थट्टा का करता, असा सवाल केला होता.

एन्रॉन वीज प्रकल्प समुद्रात बुडवू म्हणणारी शिवसेना सत्तेत आल्यावर तोच प्रकल्प समुद्रात बुडवण्याऐवजी तरंगू लागला तो कसा काय?, ही बाब जनता विसरलेली नाही. मराठी मराठीचा कंठशोष करणाऱ्या शिवसेनेने किती अमराठी लोकांना राज्यसभेत पाठवले, तेही पहा, त्यावेळी तुम्हाला मराठी माणूस दिसला नाही काय, असे एंबडवार यांनी विचारले आहे. भ्रष्टाचाराचे तर बाळासाहेब स्वत: समर्थन करायचे. मुरमुरे फुटाणे खाऊन शिवसेना सत्तेत आली तरी कार्यकर्त्यांंनी मुरमुरे फुटाणेच खावेत काय, असे बाळासाहेब म्हणायचे.

कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचे डांगे किंवा फर्नांडीस यांचा प्रभाव संपवण्यासाठी कांॅग्रेसने शिवसेना वाढवली आणि सत्तेत आलेल्या शिवसेनेला आपल्या पूर्वाश्रमीचा विसर पडला. उध्दव ठाकरे यांच्या ‘शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी मराठीजन राहिले असते तर राज्यात आज वेगळे चित्र दिसले असते’ या विधानाचा समाचार घेत नानाभाऊ म्हणाले की, बरे झाले, शिवसेनेच्या पाठीशी मराठी माणूस शंभर टक्के उभा राहिला नाही. सेनेचा सत्तेतील अनुभव जनतेला आहे. शिवसेना विरोधातच शोभते, त्यामुळे जनतेने सेनेला मते जरूर द्यावीत, पण पूर्णच काय अर्धी सत्ता देऊ नये, असे सांगून ते म्हणाले की, महापालिकेत सत्तेत असलेल्या शहरांची अवस्था काय आहे, हे सेनेने एकदा तपासून पाहिले पाहिजे.

उद्धव तेव्हा ‘बच्चा’ होते

शिवसेनेला वाढवण्याचे पाप काँग्रेसने केले. जांबुवंतराव धोटे यांचीही साथ बाळासाहेबांना मिळाली होती, पुढे धोटे शिवसेनेत जाऊन पस्तावले. त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्ष काढला. १९९५ मध्ये सेना अर्धवट सत्तेत आली आणि खुलेआम खंडणीला खतपाणी मिळाले, हा सारा इतिहास उध्दव ठाकरे विसरले तरी जनता विसरली नाही. शिवसेनेची स्थापना आणि विकास, याबाबत उध्दव ठाकरे अज्ञानी आहेत. कारण, ते त्यावेळी ‘बच्चा’ होते, असेही एंबडवार म्हणाले.