लोकसत्ता कार्यालयाला भेट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कुणाला ‘टिनपाट’ म्हणत असतील तर ते ‘सडकछाप’ होण्याच्या लायकीचे आहेत, अशी बोचरी टीका माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केली. सडक तयार करणाऱ्याच्या तोंडून आणखी काय चांगले निघणार, असा टोलाही त्यांनी लगावला. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाला मिहानमध्ये नाममात्र दरात २३० एकर जमीन देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना ‘टिनपाट’ असे संबोधले होते. त्यावर शुक्रवारी पहिल्यांदाच मुत्तेमवार यांनी पलटवार केला. भाजपचा कोणताही पदाधिकारी त्यांच्या असल्या भाषा प्रयोगापासून बचावलेला नाही, असे ते म्हणाले.

मुत्तेमवार यांनी लोकसत्ता कार्यालयाला शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी ३५ वर्षांच्या राजकारणात नागपूर आणि विदर्भात केलेली कामे, त्यासाठी केलेला पाठपुरावा यांची लांबलचक यादी वाचून दाखवली. मिहान, मेट्रो रेल्वे, गोसीखुर्द, हज हाऊस, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची संकल्पना आणि ते सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी सविस्तर चर्चा केली. काँग्रेसने ६० वर्षांत काहीच केले नाही. या भाजपच्या दाव्याचाही समाचार घेताना मिहान प्रकल्प नागपुरात आणला म्हणून बाबा रामदेव यांना जमीन देता आली, मेट्रो रेल्वेचा आराखडा तयार केला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूमिपूजन करता आले. बाबा रामदेव यांनी लोकसभा आणि विधानसभेत भाजपचा प्रचार केला. त्यामुळे मिहानध्ये २३० एकर नाममात्र दरात जमीन देण्यात आली, असा आरोप पुन्हा एकदा मुत्तेमवार यांनी केला.

सातवेळा खासदार झालो. नागपूर आणि विदर्भात अनेक प्रकल्प आणले. कोणता भूखंड हडपला, कोणत्या कंपनीत भागिदारी आहे, असे आरोप माझ्यावर नाहीत. गडकरी यांच्यावर अनेक आरोप होत असतात. त्यांच्याकडे तर सिंचन घोटाळ्यात सहभागी अधिकारीही कार्यरत आहेत. सिमेंट रस्ते घोटाळा प्रकरणात त्यांचेच नेते बनवारीलाल पुरोहित हे न्यायालयात गेले होते. त्यांनी त्यासंदर्भातील कागदपत्रे गोळा केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. तुम्ही मात्र ‘क्लिन’ झाले नाहीत, असा टोलाही मुत्तेमवार यांनी लगावला.

विदर्भाला काँग्रेसचे समर्थन

आम्ही तेलंगण राज्य केले. त्याला भाजपने समर्थन दिले. केंद्र सरकारने विदर्भ राज्याचा  प्रस्ताव आणावा, काँग्रेस त्याला समर्थन देईल. परंतु विदर्भाबाबत यांची राजकीय कटिबद्धता नाही. कारण, मोदींना विदर्भ राज्य नको आहे. वेगळे राज्य झाल्यास भाजपचे सरकार महाराष्ट्रात राहत नाही. महाराष्ट्र गमावणे म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई गमावणे आहे. लोकांचा यांच्याकडून भ्रमनिरास झाला आहे, असे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले.

‘स्मार्ट सिटी’ भूलभुलैय्या

‘जेएनएनयूआरएम’मध्ये शहराच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी निधी देण्याची योजना काँग्रेसने राबवली. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे, वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे काम झाले. आता मोदी सरकारने ‘स्मार्ट सिटी’ योजना आणली आहे. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना काय, त्यात ते नेमके काय करणार आहेत. शंभर-दोनशे कोटी रुपयांची कोणती कामे होणार आहेत, याचे उत्तर कोणी देत नाही. ‘स्मार्ट सिटी’ हे केवळ भूलभुलैय्या आहे, अशी टीकाही मुत्तेमवार यांनी केली.

महापालिका भ्रष्टाचाराचा ‘अड्डा’

महापालिकेत दहा वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. मालमत्ता कर वाढला आहे. निवडणुका असल्यामुळे वसुली थांबवण्यात आली. पाणी पुरवठा करण्याचे काम ओसीडब्ल्यूला देण्यात आले. त्यामुळे पाण्याचे दर पाचपट वाढले. या कंपनीत भाजप नेत्यांची भागिदारी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून खरेदी केलेल्या स्टार बसमध्ये यांनी घोटाळा केला. कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंपनीने २२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. कर्मचारी नियमित वेतन देण्याची विनंती करीत आहेत. परंतु गेल्या दहा वर्षांत महापालिकेला आर्थिक गर्तेत टाकण्यात आल्याने पैसा उभा करणे महापालिकेला शक्य होत नाही, असेही ते म्हणाले.