नापिकी व कर्जाला कंटाळून ऐन दिवाळीत विदर्भात शुक्रवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे एका शेतकऱ्याचे प्राण गेले. चंद्रपूर व अकोला जिल्ह्य़ात प्रत्येकी दोन शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली तर भंडारा जिल्ह्य़ात एका शेतकऱ्याचा मृत्यू विषबाधने झाला.

नागभीड तालुक्यातील बंडू उर्फ यशवंत नामदेव बोरकुटे (५०) रा.कोर्धा आणि जगदीश गोपाळा माटे (४५) रा. कोदेपार या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यावर्षी केवळ ५५ टक्के पाऊस झाल्याने ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही व मूल तालुक्यात जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्रात धानाची लागवडच झाली नाही. नापिकी आणि  कर्जाला कंटाळलेल्या बंडू उर्फ यशवंत बोरकुटे व जगदीश माटे यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी शेतालगत असलेल्या मुरूमाच्या खाणीत उडी घेऊून जीवनयात्रा संपवली.

अकोला जिल्ह्यातील वरूड बिहाडे येथील शेतकऱ्याने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. शेतकरी वासुदेव महादेव बिहाडे (५६) हे आíथक अडचणीत सापडले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे.  दिवाळीच्या पूर्वसंध्येला गावातील अंबादास ठोसर या युवा शेतकऱ्यानेही आपली जीवनयात्रा संपविली होती. पवनी तालुक्यातील कातुर्ली गावातील शेतकरी राजेश शहरा यांचा शनिवारी शेतात औषध फवारणी करताना मृत्यू झाला.