अहिंसेचे पुजारी म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी निर्भयी होते. अन्यायाविरुद्ध लढा पण सनदशीर मार्गानेच ही शिकवण त्यांनी कायम दिली. कोणत्याही पेचप्रसंगाला अतिशय तयारीने सामोरे जाणाऱ्या राष्ट्रपित्याची शिकवण त्यांच्या समर्थकांनी सोडून दिली की काय, अशी शंका आता यायला लागली आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे हे समर्थक गांधीवादी म्हणून ओळखले जातात. सध्याच्या विखारी वातावरणात गांधींसोबतच त्यांच्या या वाद्यांची सुद्धा यथेच्छ टिंगलटवाळी केली जाते. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले तर ते एकदाचे समजून घेता येईल, पण हेच गांधीवादी अन्याय मुकाटय़ाने सहन करत असतील आणि सत्तेचा रोष नको म्हणून कातडीबचाव धोरण अंगीकारत असतील तर समाजात द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरुद्ध लढायचे कुणी, असा प्रश्न निर्माण होतो. हे सारे मुद्दे उपस्थित होण्याला कारण ठरले आहे ते येथील सवरेदय आश्रमाच्या व्यवस्थापनाचे वागणे! गांधीविचाराच्या प्रसाराचे एक प्रमुख केंद्र अशीच या आश्रमाची ओळख आहे. गांधीवाद्यांकडून संचालित होणाऱ्या या आश्रमाच्या सभागृहात आजवर समाजाला विचार देणारे शेकडो कार्यक्रम झाले आहेत. गांधी व त्यांचे शिष्य विनोबांना अपेक्षित असलेला साधेपणा जपत या आश्रमाची वाटचाल सुरू आहे. अलीकडेच या आश्रमाला पोलिसांनी दोन नोटीस बजावल्या. आश्रमातील सततच्या कार्यक्रमांमुळे ध्वनिप्रदूषण होते असा त्याचा आशय. खरे तर ही नोटीशीची कारवाई साफ चुकीची. या आश्रमातील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाचा आवाज तेथील वाहनतळावर सुद्धा येत नाही हे वास्तव. येथे कधीही डीजे वाजत नाही, लग्नसमारंभ होत नाही. आजूबाजूला फार वस्तीही नसल्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होण्याचा प्रश्नही नाही. तरीही नोटीस बजावण्यात आली. का, या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. सध्या अशा सर्वच गांधीवादी संस्थांना त्रास देण्याचे दिवस आले आहेत. सत्तेचा माज चढलेले अनेकजण प्रशासनाला हाताशी धरून हे ‘महान’ कार्य करण्यात गुंतले आहेत. खरे तर या नोटीशी म्हणजे शब्दरूपी हिंसेचा प्रहारच! त्याविरोधात या गांधीवाद्यांनी सनदशीर मार्गाने आवाज उठवणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे घडले नाही. या नोटीशींना उत्तर देऊन हे गांधीवादी शांत बसले. आज गांधी जिवंत असते तरी त्यांनी नोटीशीला उत्तर हाच मार्ग प्रथम चोखाळला असता, हा गांधीवाद्यांचा युक्तिवाद मान्य करता येण्यासारखा आहे. मात्र, खरी गंमत पुढेच आहे. या नोटीस प्रकरणानंतर गांधीवाद्यांनी चक्क बचावात्मक पवित्रा घेतला व विस्थापितांसाठी लढणाऱ्या मेधा पाटकरांना एका कार्यशाळेसाठी सभागृह देण्याचे नाकारले. धरणग्रस्तांच्या बाजूने लढण्यात आपली अख्खी हयात घालवणाऱ्या मेधा पाटकरांनी कधीही हिंसेचा पुरस्कार केला नाही. गांधी, विनोबा हेच त्यांचे आदर्श राहिले. आजवरचे त्यांचे कार्यक्रम याच आश्रमात झाले आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी एका स्थानिक संघटनेचा अर्ज आला तेव्हा एका ज्येष्ठ गांधीवाद्याने यावर सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्या, असे सूचक विधान केले व व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांना त्यातला अर्थ काय, तो बरोबर कळला. परवानगी नाकारल्यावर विचारणा झाली तेव्हा आयोजक संस्था नोंदणीकृत नव्हती. आधीच नोटीसा आलेल्या आहेत. उगीच कायदेशीर अडचण नको, असा पवित्रा घेतला गेला. गांधीवाद्यांचे हे नवे रूप बघून अनेकजण थक्क झाले आहेत. आश्रमाची जागा सरकारी आहे. ती हातची जाईल, अशी भीती या वाद्यांना वाटणे हा गांधीविचारांचाच पराभव आहे. हा विचार इतका कमजोर कधीच नव्हता. केवळ जागा, त्यावर उभा राहिलेला आश्रम ताब्यातून जाईल म्हणून गांधीवाद्यांनी दाराआड लपणे अतिशय खेदजनक आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी गांधीविचाराला किंवा त्याची जपणूक करणाऱ्या संस्थांना हुसकावून लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणारा नाही हे वास्तव आहे. एखादवेळी संस्थेचा ताबा घेतला जाईल, पण विचार चिरडून टाकणे सत्ताधाऱ्यांच्या हातात नाही, इतका तो समाजातील प्रत्येक घटकाच्या नसानसात भिनला आहे. अशा संकटकाळी खरे तर याच गांधीवाद्यांनी पुढाकार घेत ‘मेधाताई करा कार्यक्रम, बघू काय होते ते’ अशी रोखठोक भूमिका घ्यायला हवी होती. तसे न करता फुटकळ कारण देत पाटकरांना आश्रमापासून दूर ठेवणे हा भ्याडपणा झाला. मेधा पाटकर सतत सरकारविरोधी बोलतात. आधी व आताच्या सरकारविरुद्ध त्यांचा लढा आहे. या भीतीमुळे तर त्यांना परवानगी नाकारण्यात आली नाही ना, अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे. सामान्यांच्या बाजूने व स्वातंत्र्यासाठी लढताना महात्मा गांधींनी कधीही कोणत्या सरकाराची तमा बाळगली नाही, मग ते इंग्रजांचे असो की स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले आपल्याच पक्षाचे सरकार असो. गांधीजी कायम समाजातील शेवटच्या घटकासाठी लढत राहिले व सरकारांना भंडावून सोडणारे प्रश्न उपस्थित करत राहिले. आजच्या विषाक्त वातावरणात हीच हिंमत या गांधीवाद्यांनी दाखवणे गरजेचे आहे. ती दाखवायचे सोडून प्रशासन व पर्यायाने सत्ताधाऱ्यांना भिणाऱ्यांना गांधीवादी तरी कसे म्हणायचे? सध्या सर्वत्र धर्मावरून भांडणे लावली जात आहेत. गायीवरून माणसे मारली जात आहेत. समाजात दुही पेरून वातावरण कलुषित केले जात आहे. या बिकट परिस्थितीत हा आश्रम सामाजिक सलोख्याचा विचार देणारे केंद्र ठरायला हवा. हा सलोखा कसा महत्त्वाचा आहे, हेच पटवून देणारे कार्यक्रम येथे व्हायला हवेत. एकतेचा संदेश देणारे स्फूर्तिस्थान अशी ओळख या आश्रमाने तयार करायला हवी. आज त्याचीच नितांत गरज असताना ताब्यात असलेली संस्था वाचावी, अशी संकुचित भूमिका ते कशी काय घेऊ शकतात? केवळ हा आश्रम संचालित करणारेच नाही तर तमाम गांधीवाद्यांच्या बाबतीत सर्वाच्याच मनात अजूनही आदराची भावना आहे. हा आदर द्विगुणित व्हावा, या दृष्टीने विचार करायचा सोडून सरकारी कारवाईच्या भीतीने बचावात्मक पवित्रा घेण्याचा प्रकार या ज्येष्ठांना शोभणारा नाही. केवळ हा आश्रमच नाही तर विदर्भातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या इतर गांधीवाद्यांनी सुद्धा अनेक प्रसंगात मौन बाळगण्यातच धन्यता मानली आहे. ज्यांच्याकडे आशेने बघावे त्यांनीच निराशा करावी यासारखे दुसरे दु:ख कोणते नसते. या प्रसंगातून तेच अनेकांच्या वाटय़ाला आले आहे. भलेही हे गांधीवादी दुबळे निघाले असतील पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधी विचारांवर कारवाईचा वरवंटा फिरवताना विवेक बाळगण्याची गरज आहे. सध्या या उपराजधानीत मोजकीच ठिकाणे विचारांची व्यासपीठे म्हणून उरली आहेत. त्यांनाही नष्ट कराल तर दीर्घकाळ सत्तेची स्वप्ने बघू नका, हेही या सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगणे गरजेचे आहे.

devendra.gawande@expressindia.com