बाल सुधार गृहातून पळालेल्या चारपैकी तिघी अद्याप बेपत्ता, चार आरोपींना अटक

आमदार निवासातील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच महिला सुधार गृहातून पळून गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

आरोपींनी भुकेने व्याकूळ मुलीला जेवण देण्याचे आमिष दाखवून तिला व्हेरायटी चौकातून शुक्रवारी रात्री ऑटोरिक्षातून नेले आणि शनिवारी पहाटे तेथे आणून सोडले. सीताबर्डी पोलीस ठाणे या चौकातच आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ आणि  पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना ही घटना घडली आहे. अपहरणानंतर सामूहिक बलात्कार करून मुलीला पुन्हा चौकात आणून सोडण्यात आल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती उरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

जुन्या  काटोल नाक्याजवळील महिला सुधार गृहातून २० एप्रिलला चार मुली पळून गेल्या होत्या. त्यातील एका मुलीवर सुगतनगर येथील एका निर्माणाधीन फ्लॅटमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित गतिमंद आहे. याप्रकरणी सीताबर्डी चौकातील चप्पल विक्रेता फिरोज अहमद जमील अहमद (४०), ऑटोरिक्षा चालक स्वप्निल देवानंद जवादे (२७), फिरोजच्या दुकानातील नोकर मयूर रमेश बारसागडे (२३) आणि सीताबर्डी चौकातील दुसऱ्या एका चप्पल दुकानातील नोकर अतुल ऊर्फ नरेश जनबंधू (२२) यांना अटक केल्याची माहिती परिमंडळ क्रमांक २ चे पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांनी दिली.

पीडित मुलीचे आई-वडील मरण पावले असल्याने तिला आश्रमात ठेवले होते. तेथून काही दिसवसांपूर्वी तिला महिला सुधार गृहात ठेवण्यात आले. तेथील राहणीमान पसंत नसल्याने पीडित मुलीने तीन मैणित्रींसह २० एप्रिलला तेथून पळ काढला होता. चौघीही दिवसभर शहरात फिरल्यानंतर रात्री एका दुकानासमोर झोपल्या. दुसऱ्या दिवशी सर्व मैत्रिणी निघून गेल्या. पीडिता सीताबर्डी परिसरात एकटीच दिवसभर फिरत होती. दुपारी ४ वाजताच्या सुमारास एका चप्पलच्या दुकानाजवळ बसून ती रडत होती. तेथून जात असलेल्या एका ऑटोरिक्षा चालकाने तिला समोसा खाऊ घातला. त्यानंतर ती उड्डाण पुलाजवळ फिरत होती. रात्री दहा वाजताच्या सुमारास फिरोज तिथे आला आणि तिला का रडते, असे विचारले. तिने भूक लागल्याचे सांगितल्यावर त्याने जेवण देतो म्हणून एका ऑटोरिक्षात बसवले. फिरोजने आणखी तीन आरोपींना सोबत घेतले. रस्त्यात बिर्याणी आणि पाण्याचे पाऊच घेतले. ऑटोतून फोन लावून मित्राला गादी आणून ठेवण्यास सांगण्यात आले. जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सुगतनगरातील एका निर्माणाधीन फ्लॅटमध्ये तिला नेण्यात आले. तिला चिकन बिर्याणी खाऊ घातले. दरम्यान, आणखी दोघे तेथे आले. जेवण झाल्यावर ते दोघे बाहेर गेले आणि ऑटोरिक्षातून आलेल्या आरोपींनी युवतीवर बळजबरी करण्यास सुरुवात केली. तिने विरोध केला असताना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी बलात्कार केल्यावर त्यांनी तिला आपल्याकडील टी-शर्ट आणि जिन्स घालायला दिले आणि व्हेरायटी चौकात पहाटे ४ वाजता आणून सोडले. स्थानिकांनी तिला पोलीस ठाण्यात नेल्यानंतर हा प्रकार उघड झाला.