मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावरील घटना; दिवसाढवळ्या भर बाजारात गोळीबार, एक जखमी

सुदामनगरी परिसरातील कुख्यात गुंड सचिन ऊर्फ डुंडा प्रकाश सोमकुंवर (३५) याच्यावर दहा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना शहरातील गजबजलेल्या धरमपेठ परिसरातील गोकुळपेठ बाजारपेठेत पोलीस चौकीच्या समोर गुरुवारी दिवसाढवळ्या दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. एकामागून एक झालेल्या गोळीबाराचा आवाज ऐकताच लोकांनी आपली दुकाने बंद करून पोबारा केला. दोन टोळ्यांमधील संघर्षांतून हा खून झाला असून भविष्यात टोळीयुद्ध भडकण्याच्या भीतीने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

सचिनचे वडील प्रकाश हे गोकुळपेठ बाजारात बटाटा, कांदे विकतात. त्याला नितीन सोमकुंवर हा लहान भाऊ आहे. सचिनचे आतापर्यंत दोनदा लग्न झाले. पहिली पत्नी त्याच्या गुंडगिरीला कंटाळून अमरावती येथे निघून गेली. त्याला पहिल्या पत्नीपासून कनिका नावाची मुलगी आहे. पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर त्याने दुसरा विवाह केला. तिच्यासोबत तो अंबाझरी तलाव परिसरात राहायचा. दुसऱ्या पत्नीपासून त्याला मंथन नावाचा पाच महिन्यांचा मुलगा आहे.

सचिन हा सेवक मसराम टोळीचा खास सदस्य होता. पांढराबोडी, सुदामनगरी परिसरात दारूची अवैध विक्री करणे, जुगार अड्डे चालविणे, खंडणी वसूल करणे, हप्ता वसुली करण्याचे काम मसराम टोळी करायची. दरम्यान, सुदामनगरी परिसरात श्रीकांत ऊर्फ बाल्या उईके या गुंडाचा उदय झाला होता. त्याने स्वत:ची टोळी निर्माण करून सेवक मसराम याच्या मामाचा खून करून त्या टोळीला आव्हान दिले होते. या खुनाचा वचपा काढण्यासाठी सेवक मसराम आणि सचिन यांनी २२ मार्च २०१४ ला बाल्याची एका सलूनमध्ये गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर बाल्याचा मावसभाऊ राजा परतेकी टोळीचे नेतृत्व करू लागला.

बाल्याच्या खुनानंतर राजा परतेकी हा सेवक मसराम आणि सचिनच्या मागावर होता. मात्र, सचिनला राजाच्या हेतूची माहिती होती.

त्यामुळे तो अनेक दिवसांपासून घरातून बाहेर पडतच नव्हता. आज गुरुवारी अचानक सचिन हा मित्र सुरेश डोंगरे(२८) याच्यासह वडिलांच्या दुकानाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाला. याची माहिती राजा परतेकीला मिळाली. त्यावेळी राजा हा आपल्या तीन ते चार साथीदारांसह स्वीफ्ट डिझायर आणि इंडिएवर या दोन कारने गोकुळपेठ बाजारात आला.

राजा आपल्या मागावर असल्याची कल्पना सचिनला नव्हती. सचिनने दुचाकी उभी केली आणि पायीच मित्रासह वडिलांच्या दुकानाकडे जात होता. त्यावेळी अचानक दोघांनी सचिन आणि सुरेश यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी सचिनच्या अंगावर जवळपास दहा गोळ्या लागल्याने संपूर्ण शरीराची चाळणी झाली होती, तर सुरेशच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली. त्यानंतर आरोपी पिस्तूल हवेत भिरकावत दोन कारमधून पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकताच आणि रस्त्यावर रक्ताचा सडा बघून लोकांची पळापळ झाली. दुकानदारांनी दुकाने बंद केली. परंतु जवळच असलेल्या बटाटा, कांदे विकणाऱ्या सचिनच्या वडिलांनी जवळ जाऊन बघितले असता तो आपला मुलगा असल्याचे समजले. त्यानंतर सचिनला मातृ सेवा संघ आणि सुरेशला वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु सचिनचा जागीच मृत्यू झाला होता. नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी करून एका नागरिकाने खुनाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा प्रचंड ताफा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तिघांना ताब्यात घेतले

या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी राजा परतेकी आणि त्याच्या साथीदारांचा पूर्वेतिहास बघून त्यांच्या घर आणि परिसरात शोध घेतला. वृत्त लिहिस्तोवर परतेकीचा साथीदार अंकित याला त्याच्या घराच्या परिसरातून आणि बिट्ट याला लॉ कॉलेज चौक परिसरातून ताब्यात घेतले. तिसऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव समजू शकले नाही, तर परतेकी हा फरार आहे. या घटनेनंतर टोळीयुद्ध उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पोलिसांनी पांढराबोडी आणि सुदामनगरी परिसरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा उभा केला आहे.

नागपुरात काय सुरू आहे?

६ सप्टेंबरला सकाळी आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांच्यावर गांधीबाग परिसरातील पाच गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यानंतर अजनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील ओंकारनगर परिसरातील अजमेरी मटन शॉपचे मालक यासीन अन्सारीवर गोळी झाडण्यात आली. मात्र, गोळी दंडाला लागून गेल्याने तो बचावला. तर ९ सप्टेंबरला सक्करदरा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बुधवारी बाजारात कुख्यात आशीष राऊत याचा भाजीविक्रेत्यांनी दगडाने ठेचून खून केला, तर दोन दिवसांपूर्वी सक्करदरा पोलीस ठाण्यासमोरच एका घरात शशिकला ठाकरे यांचा कामगारांनीच लुटपाटीच्या उद्देशाने खून केला. त्यानंतर आज गुरुवारच्या गोळीबाराने संपूर्ण नागपूर शहर हादरले असून एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गोळीबार करून खून करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे नागपुरात काय सुरू आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले असून गुंडांनी कायदा व सुव्यवस्था वेशीला टांगली आहे.

कायद्याचाही धाक उरला नाही

सूरज यादव हत्याकांडात काल बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने कुख्यात डल्लू सरदार आणि त्याच्या टोळीतील इतर आठ सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे समाजाचा चांगला संदेश जाईल आणि गुंडांवर कायद्याचा वचक राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. परंतु नऊ कुख्यात गुंडांना शिक्षा होताच दुसऱ्या दिवशी पुन्हा टोळीयुद्ध पेटले. यावरून गुंडांमध्ये आता कायद्याचीही भीती उरली नसल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

((   खुनाच्या घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी  )))