कुख्यात गुंडाला भाजपमध्ये प्रवेश

राजकीय पुढारी आणि गुन्हेगार यांच्यात जवळचे संबंध आहेत. एकप्रकारे गुन्हेगारांना राजकीय पुढाऱ्यांचाच आशीर्वाद असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना उपराजधानीत पुन्हा एकदा गुन्हेगारीला असलेला राजाश्रय समोर आला आहे. भांडे प्लॉट परिसरातील कुख्यात गुंडाला स्वच्छ प्रतिमेच्या पक्षाने प्रवेश दिला असल्याने गुन्हेगारी व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतीय जनता पक्ष हा स्वच्छ प्रतिमेला आहे, असे त्याच पक्षाचे नेते जाहीरपणे प्रचार करतात. मात्र, उपराजधानीचा विचार करता गुन्हेगारांना काँग्रेसपेक्षा याच पक्षाने जवळ केले आहे. ‘डॉन’ संतोष आंबेकर याचे भाजपचे आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासोबत संबंध असल्याचे अनेकदा समोर आले आहे. याशिवाय आंबेकर हा अनेकदा वाडय़ावरही अनेकांना दिसला. काही दिवसांपूर्वी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर आमदार परिणय फुके यांच्या मिरवणुकीत तो दिसला. त्यासंदर्भात सर्व प्रसारमाध्यमांमध्ये फुके आणि आंबेकर यांच्यातील संबंधांची चर्चा झाली.

याशिवाय गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला अनिल धावडे हा भाजपचा नगरसेवक आहे. नगरसेवक होण्यापूर्वीची त्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असून धावडे बंधूंचा इतिहास शहरातील प्रत्येकाला माहीत आहे. याशिवाय कुख्यात गुंड बाल्या माने याने काही महिन्यांपूर्वी थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकवले होते. याऊलट कुख्यात राजू भद्रे याचे संबंध कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार आणि माजी महापौरांशी असल्याचे जाहीर झाले आहे. कुख्यात मधू कांबळे हा काँग्रेसचा नगरसेवक राहिला असून सध्या भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. परंतु अद्यापही त्याने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. बाल्या मानेही नगरसेवकपदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याशिवाय भांडे प्लॉट येथील कुख्यात गुंड नागेश गोविंदराव सहारे याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महिनाभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. नागेश याला पक्षात घेण्यासाठी आमदार आणि शहर भाजपचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीच प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. नागेशवर १९९७ मध्ये इमामवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. १९९९ मध्ये सक्करदरा पोलीस ठाण्यात घरात घुसणे, २००३ व २००५ मध्ये मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्याला मारहाण, २००५ मध्ये सक्करदरा पोलीस ठाण्यांतर्गत मारहाण करण्याच्या अनुषंगाने घातक शस्त्रांसह एकत्र येणे आदी गुन्हे दाखल झाले. चार वर्षांपूर्वी २०१२ मध्ये अजनी पोलीस ठाण्यांतर्गत एक खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या सर्व घटनांवरून कदाचित कोहळे यांना नागेश यांचा पूर्वेतिहास माहित नसावा? असा सवाल भाजपमधूनच उपस्थित करण्यात येत आहे.

भाजप शहराध्यक्षांच्या दृष्टीने नागेश सहारे सामाजिक कार्यकर्ता

या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, नागेश सहारे यांनी आई फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांचा पूर्वेतिहास विसरून त्यांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. ते सध्या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत. बाल्या मानेला पक्षात प्रवेश देण्यात आलेला नाही. त्याने केवळ उमेदवारीची मागणी करणारा अर्ज भरला आहे.