डॉक्टर दाम्पत्याविरुध्द तक्रार
प्रेमप्रकरणातून गर्भवती राहिलेल्या कुमारिकेचा गर्भपात करतांना झालेला मृत्यू आणि प्रकरण अंगावर शेकणार, या भीतीने प्रियकराने केलेली आत्महत्या आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरुध्द करण्यात आलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्य़ात खळबळ निर्माण केली आहे.
कळंब तालुक्यातील बोरी महल येथील एका तरुणीशी वणी तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचे प्रेमसंबंध होते. त्यातून तरुणी गर्भवती झाली. तिचा गर्भपात करण्यासाठी एका खासगी डॉक्टर दाम्पत्याकडे नेल्यावर अतिरक्तस्त्रावाने ती बेशुध्द झाली. तिला यवतमाळच्या इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला. या तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर घाबरलेल्या तरुणाने रासा-बोरीमहल मार्गावरील एका शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, गर्भपात करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याविरुध्द विलास मस्कर आणि मुलीच्या वडीलांनी तक्रार दाखल केली आहे. हे डॉक्टर दाम्पत्य फरार असल्याचे समजते. गर्भपाताने मृत्यू झालेल्या १८ वर्षीय तरुणीचे नाव रंजना असून आत्महत्या केलेल्या तिच्या २१ वर्षीय प्रियकराचे नाव दुर्वेश आहे. दुर्वेश वणी तालुक्यातील रासा येथील राहणारा होता. त्याचे जावई विलास मस्कर कळंबला असतात. दुर्वेश गेल्या १० वर्षांंपासून वास्तव्याला होता. त्याचे कळंबजवळील बोरीमहल येथील रंजना या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून ती गर्भवती झाली होती. डॉक्टर दाम्पत्याने गरकायदेशीर गर्भपात केला आणि त्या बदल्यात प्रियकर तरुणाकरुन मोठी रक्कम उकळून त्याला बदनामीची धमकी दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यावर कळंब पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत.