नागपूर विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या मार्च २०१६च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारून पुन्हा एकदा गुणवत्तेचा शिरस्ता कायम राखला आहे.

विभागीय मंडळातर्फे १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेस एकूण १,५५,८९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी १,५५,७२८ परीक्षेला प्रविष्ट झाले. परीक्षेत १,३४,४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

त्यापैकी ६५,२२३ मुले आणि ६९,२५० मुली आहेत. नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.३५ एवढी आहे. गेल्यावर्षी नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.११ टक्के होता. त्यामुळे यावर्षी ५.७६ टक्के एवढी निकालात घट आली आहे. तसेच यावर्षी ७,६९६ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षार्थी म्हणून नोंदणी केली होती. पैकी ७,६३९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यापैकी २,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ३६.६८ टक्के आहे. गेल्यावर्षी पुनर्परीक्षार्थीची टक्केवारी ४९.०९ टक्के होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत पुनर्परीक्षार्थीची उत्तीर्णतेची टक्केवारीही कमी झाली आहे.

नागपूर विभागीय मंडळातील ६ जिल्ह्य़ातील नियमित विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी पाहिल्यास नागपूर जिल्हा प्रथम तर गडचिरोली सर्वात शेवटी आहे. नागपूर जिल्ह्य़ात ६२,१४० प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ५४,९९९ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.५१ टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर भंडारा असून तेथील प्रविष्ट विद्यार्थी १६,१७२ होते, त्यापैकी १४,२८८ उत्तीर्ण झाले. टक्केवारी ८८.३५ टक्के आहे.

त्यानंतर गोंदियात प्रविष्ट २०,५८४ विद्यार्थ्यांपैकी १७,८१० उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.५२ टक्के आहे. चंद्रपुरात प्रविष्टांची संख्या २७,८७६ एवढी असून त्यापैकी २३,२९१ उत्तीर्ण झाले आणि त्याची टक्केवारी ८३.५५ टक्के एवढी आहे. वर्धा जिल्ह्य़ात प्रविष्ट विद्यार्थी १६,६१७ होते.

त्यातून १३,८७९ उत्तीर्ण झाले. वर्धेची उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ८३.५२ टक्के आहे. नागपूर विभागात उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वात कमी ८२.७१ टक्के असून तेथे १२,३३९ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले.

त्यापैकी १०,२०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात १,४१४ कनिष्ठ महाविद्यालये असून भंडाऱ्यात १५३, चंद्रपुरात २६३, नागपुरात ४५३, वध्र्यात १५१, गडचिरोलीत १८१ आणि गोंदिया जिल्ह्य़ात २१३ महाविद्यालये आहेत.

एकूण ४२ विषयांचा निकाल १०० टक्के जाहीर करण्यात आला आहे. मंडळाच्यावतीने १३७ विषयांमध्ये परीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्णतेची सर्वात कमी टक्केवारी इंग्रजी विषयाची आहे. इंग्रजीत १,६१,४४९ एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १,५९,५५२ एवढे प्रविष्ट झाले आणि १,३८,१०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.५६ टक्के आहे. १०० टक्के निकाल असलेले काही विषयही गमतीशीर आहेत. कारण त्यात तेलगु, जापनीज, पिक्टोरिअल काम्पोझिशन, कला इतिहास या विषयांच्या परीक्षेला बसलेला एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल १०० टक्के आहे. पर्यावरण शिक्षण, भूगर्भशास्त्र, तत्त्वज्ञान, चित्रकला, डिझाईन आणि कलर, व्होकल लाईट म्युझिक, व्होकल क्लासिकल म्युझिक, सामान्य स्थापत्य अभियांत्रिकी, कार्यालयीन व्यवस्थापन, फळशास्त्र, फ्रेश वॉटर फिश कल्चर, क्रॉप सायन्स १,२,३, मेडिकल लॅब टेक्निशियन १,२,३, एक्स रे टेक्निशियन १,२,३, ऑप्थॅल्मिक टेक्निशियन १,२,३, शिशुगृह १,२,३, टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल टेक्निक १,२,३, बँकिंग १,२, कार्यालयीन व्यवस्थापन १, डेअरी टेक्नॉलॉजी १,२,३ आणि संगणक तंत्र १,२,३ या विषयांचा १०० टक्के निकाल आहे.

वर्धा जिल्ह्य़ात कॉपीची सर्वात जास्त प्रकरणे

नागपूर विभागातील यावर्षी एकूण कॉपी प्रकरणे २६१ आहेत. त्यापैकी सर्वात जास्त २६ प्रकरणे वर्धा जिल्ह्य़ाची आहेत. गेल्यावर्षी कॉपीची सर्वात जास्त प्रकरणे चंद्रपुरात ३३ एवढी होती. यावर्षी एकूण ७५ कॉपी प्रकरणांवर मंडळाने निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी ११८ कॉपी प्रकरणांपैकी १०४ विद्यार्थी दोषी आढळले होते. मात्र यावर्षी चंद्रपुरात केवळ तीन प्रकरणे हाती आली. भंडाऱ्यात तीन, नागपुरात पाच, वध्र्यात २६, गडचिरोलीत १३ आणि गोंदियात २५ आहेत, तर गेल्यावर्षी नागपूर- १३, वर्धा- २२, गडचिरोली- १५ आणि गोंदियात २७ कॉपी पकडण्यात आल्याचे नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय गणोरकर यांनी सांगितले.