सरकारी पक्षाची न्यायालयाला विनंती; बचाव पक्षाकडून दोन निकाल सादर
युग मुकेश चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे खंडणीसाठी अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याच्या प्रकरणात बुधवारी सरकारी पक्षाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती केली. आपल्या मागणीला पुष्टी देण्यासाठी सरकारी पक्षाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांना तीन सर्वोच्च न्यायालय आणि दोन उच्च न्यायालयाचे निकाल सादर केले. तर बचाव पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे दोन निकाल सादर करून आरोपींना कमीत कमी शिक्षा ठोठावण्याची विनंती केली.
सर्व पक्षांचा शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण निकालासाठी गुरुवारी ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ठेवले आहे. मूळचे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील डॉ. मुकेश चांडक आणि डॉ. प्रेमल चांडक हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त नागपुरात स्थायी झाले.
त्यांचे वर्धमाननगर परिसरात दंत रुग्णालय आहे. त्यांना धृव ( १३) आणि युग ( ८ ) ही दोन मुले. युग हा सेंटर पॉईंट शाळेच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. १ सप्टेंबर २०१४ संध्याकाळी ४.३० च्या सुमारास स्कूलबसमधून घरासमोर उतरला असता आरोपी राजेश उर्फ राजू अन्नालान दवारे (२०, रा. वांजरी ले-आऊट, कळमना) आणि अरविंद अभिलाष सिंग (१९, प्रिती ले-आऊट, नारा रोड, जरीपटका) यांनी युगचे अपहरण केले. त्याला दुचाकीवरून नागपूरपासून २७ किलोमीटर अंतरावर पाटणसावंगी परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी लोणखरी परिसरातील एका नाल्यात युगचा निर्घृण खून केला आणि त्याला तेथेच वाळूमध्ये पुरले.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी केला. आरोपींविरुद्ध भादंविच्या ३०२, ३६४ (अ) आणि १२० (ब) अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी प्रधान सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमक्ष झाली. सरकारने या प्रकरणात एकूण ५० साक्षीदार तपासले.
सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, डॉ. महेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा, आरोपींतर्फे अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल आणि अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय यांनी बाजू मांडली. सर्व साक्षीपुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने आज दोन्ही आरोपींनी अपहरण, खून करणे आणि खुनाचा कट रचण्याच्या आरोपात दोषी धरले.

आरोपींकडून युगचा विश्वासघात
आरोपींच्या शिक्षेवर बुधवारी सुनावणी झाली. सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे तीन आणि उच्च न्यायालयाचे दोन नोंदणीकृत निकाल प्रधान सत्र न्यायाधीशांना सादर केले. यावेळी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपी राजेश हा रुग्णालयात कामावर असतानाही त्याने येणाऱ्या रुग्णांची फसवणूक करून पैसा उकळला आहे. यावरून त्याला विनाश्रम पैसा कमविण्याचा हव्यास असून अतिरिक्त पैसा कमविण्यासाठी त्याने युगचे अपहरण केल्याचे सिद्ध होते. युगचे अपहरण करण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या पोशाखाचा वापर केला. आरोपीनी युगला रुग्णालयात घेऊन जाण्याचे कारण सांगून त्याचे अपहरण केले. आरोपींनी युगचा विश्वासघात करून त्याला संपविले. घटनेनंतर आरोपींच्या चेहऱ्यावर पश्चातापही दिसत नाही. या घटनेमुळे समाजातील नागरिक आणि त्यांच्या पाल्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गुन्हेगारांना धडा मिळावा म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती सरकारी पक्षाने केली.आरोपींचे वय २० च्या घरात आहे. फाशीची शिक्षा ठोठावण्यासाठी हे अतिशय कमी वय आहे. शिवाय आरोपी हे सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांच्या हातून घडलेला हा पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे आरोपींचे वय लक्षात घेऊन त्यांना सुधारण्याची संधी मिळायला हवी. त्यामुळे आरोपींना फाशीऐवजी कमीत कमी कारावासाची शिक्षा ठोठवावी, अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात केली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दोन नोंदणीकृत निकाल सादर केले.