राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक अनपेक्षित धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार धनश्री टोमणे यांनी विजय मिळवलाय. या ठिकाणी एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. त्यामुळे ग्रामपंचायतीत बहुमत मिळूनही सरपंचपद भाजपच्या हातातून निसटले आहे. तर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी गावातील सरपंचपदाच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव झालाय. या ठिकाणी काँग्रेसचे सुनील गंगाराम दुधपचारे सरपंचपदी निवडून आले. काल १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. यातील साधारण ३८० ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपला नांदेड महानगरपालिका आणि देशभरातील पोटनिवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपने आपल्याला मोठे यश मिळाल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधी पक्षांकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले होते. पहिल्यांदाच राज्यात थेट सरपंचपदाची निवडणूक पार पडली. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांबाबत उत्सुकता होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. यामुळेच प्रत्येक पक्षाने आपलेच सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या या दाव्याला नक्की पुरावा असा काहीच नाही. कारण निवडणुका आघाडय़ांच्या माध्यमातून लढविल्या जात असल्याने नक्की कोणत्या पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत हे स्पष्ट होऊ शकत नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीत करणी करण्याचा प्रकार

पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर भाजपने सर्वाधिक १४५७ जागा जिंकल्याचा दावा केला. काँग्रेस ३०१, शिवसेना २२२ तर राष्ट्रवादीने १९४ जागा जिंकल्याचा दावा भाजपच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला होता. भाजपचा हा दावा काँग्रेसने खोडून काढला. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात काँग्रेसने सर्वाधिक १०६३ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीने ८३४ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजपने ८१३ ठिकाणी विजय मिळविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

ज्याचा त्याचा निकाल वेगळा!