शोकाकुल वातावरणात अंड्रस्कर कुटुंबीयांवर अंत्यसंस्कार

काश्मीरचे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी गेलेले, पण ते बघतानाच काळाने डाव साधल्याने अपघाती मृत्यू झालेल्या जयंत अंड्रस्कर, त्यांच्या पत्नी मनीषा आणि दोन मुली अनुक्रमे अनघा व जान्हवी यांच्यावर सोमवारी मोक्षधाम घाटावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांच्या तिरडीवर अनघा, आई मनीषाच्या तिरडीवर जान्हवीला ठेवण्यात आले होते. हे दृश्य बघून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.

काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या अंड्रस्कर कुटुंबीयांतील चौघांचा गुलमर्गमध्ये केबल कार टॉवर कोसळल्याने रविवारी मृत्यू झाला होता. सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर पोहचले. तेथून महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून जुना सुभेदार लेआऊट येथील अंड्रस्कर यांच्या निवासस्थानी पोहोचताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी एकच गर्दी केली होती.

कर्मचाऱ्याचा खर्च अंड्रस्कर कुटुंबावर

जम्मू काश्मीरहून मृतदेहासोबत पवन सिंग सोडी हा जम्मू-काश्मीर पर्यटन विकास महामंडळाचा कर्मचारी नागपूपर्यंत आला. या कर्मचाऱ्याचे सुमारे २७ हजार रुपयांचे विमानाचे तिकीट व इतर खर्च हा अंड्रस्कर कुटुंबाला करावा लागला.

मुख्यमंत्र्यांची मदत

जम्मू काश्मीर पर्यटन विकास महामंडळाकडून चारही पार्थिव नागपुरात पाठवण्याकरिता श्रीनगरहून दिल्ली, दिल्लीहून मुंबई, मुंबईहून नागपूर अशी व्यवस्था गो-एयरच्या विमानातून करण्यात आली होती. परंतु मुंबईहून नागपूरला येणारे विमान हे विलंबाने येणार होते. त्यामुळे पार्थिव रात्री ८ नंतरच पोहचणे शक्य असल्याने नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आपत्कालीन विभागाला मदतीच्या सूचना केल्या. त्यानंतर सूत्रे हलली.