उत्तेजक घटकांचे प्रमाण आढळले; हर्बालाईफ कंपनीचा १७ लाखांचा साठा जप्त

नागपूरसह राज्यातील अनेक व्यायामशाळेत रोज हजारो युवक मोठय़ा प्रमाणावर घेत असलेल्या पूरक पौष्टिक आहारात (न्युट्रास्युटिकल, हेल्थ सप्लिमेंट, फूड सप्लिमेंट) कॅफेनसह इतर काही उत्तेजक घटकांचे प्रमाण आढळून आले असून ते आरोग्यासाठी घातक आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागपूरच्या एका गोदामावर छापा टाकून ‘हर्बालाईफ’ या कंपनीचा तब्बल १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या वेळोवेळी डोपिंग चाचण्या घेतल्या जातात. त्यात काही खेळाडूंनी उत्तेजक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले होते. या खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच चौकशी करण्यात आली. त्यावेळी या खेळाडूंनी व्यायामशाळेत सहज उपलब्ध होणारा पूरक पौष्टिक आहार (‘न्युट्रास्युटिकल’, ‘हेल्थ सल्पिमेंट’, ‘फूड सप्लिमेंट’) घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर या आहाराची तपासणी करण्यात आली असता काहींमध्ये कॅफेनसह इतर काही उत्तेजक घटक आढळून आले. याबाबत नॅशनल अ‍ॅन्टी-डोपिंग एजेन्सीने केंद्रीय फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅन्डर्ड अथॉरेटी ऑफ इंडियाला संभावित धोक्याची माहिती दिली.

केंद्राच्या सूचनेवरून अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना मिळताच त्यांनी राज्यात विक्री होणाऱ्या वरील पदार्थाच्या तपासण्या केल्या. त्यातही वरील बाब स्पष्ट झाली. त्यामुळे नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने गजानन नगरमधील रॉयल हाऊसमध्ये असलेल्या मे. हर्बालाईफ इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गोदामावर छापा टाकून सुमारे १७ लाखांचा साठा जप्त केला. त्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून तेथील अहवाल प्राप्त झाल्यावर अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ अंतर्गत संबंधितावर पुढील कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सहआयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अभय देशपांडे, प्रवीण उमप, सीमा सुरकर, किरण गेडाम यांनी केली.

आहार गायब

एफडीएने छापा मारलेल्या कंपनीचा पूरक आहार शहरातील अनेक व्यायामशाळेत सहज विक्रीकरिता उपलब्ध आहे. या कारवाईची माहिती कळताच शहरातील बहुतांश व्यायामशाळा संचालकांचे धाबे दणाणले. काहींनी त्यांच्या व्यायमशाळेतून आहाराचे पाकिटे इतरत्र हलविल्याची माहिती आहे.

हा आहार आरोग्याला अपायकारक असल्याने नागपुरातील गोदामावर छापा टाकून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या पदार्थाच्या सेवनामुळे काही क्रीडापटू विविध डोपिंग चाचणीत दोषी आढळले होते. पुढच्या काळात या पदार्थाचे तपासणी अभियान राबवले जाईल.

मिलिंद देशपांडे, सहआयुक्त (अन्न), नागपूर