ग्रामीण भागात आजाराचे अद्याप निदान नाही

प्रत्येक १ हजार लहान मुलांपैकी ८ जणांच्या ह्रदयाला विविध कारणांमुळे छिद्र असतात, अशी माहिती एका हृदयविकार तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आली आहे. ग्रामीण, मागास आणि दुर्गम भागातील सर्व मुलांच्या हृदय आजाराचे अद्यापही १०० टक्के निदान होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

नागपूरसह देशभरात नागरिकांमध्ये बदलती जीवनशैली, खानपानाच्या वाईट सवय आणि इतरही कारणांमुळे मधुमेह, रक्तदाबासह इतर अनेक आजार बळावत आहेत. लहान मुलांमध्येही हृदयविकाराची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. एका अभ्यासात प्रत्येक १ हजार मुलांपैकी ८ मुलांच्या हृदयाला छिद्र असल्याचे आढळून आले आहे.  हृदयाचे आजार असलेल्यांची संख्या याहून जास्त आहे.

हृदयाच्या छिद्र अनुवांशिकता, नातेवाईकांमध्ये विवाह, गर्भवती असताना महिलेकडून चुकीचे औषध घेणे यासह इतरही काही बाबी कारणीभूत ठरतात. ग्रामीण भागात आजही बहुतांश नागरिक हे मुलांना काहीही त्रास झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत नाही.

औषध दुकानदाराला मुलांना होणारा त्रास सांगून मुलांना औषध देतात. त्यामुळे मुलांच्या हृदयाला छिद्र असल्यास त्याचे विलंबाने निदान होते. काहींचे ते होतही नाही. त्यामुळे हा मुलगा सतत वेदना सहन करतो. जास्तच आजार बळावल्यावर त्यातील काही रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात व तेथे आजाराचे निदान होते. त्वरित निदान झाल्यास त्यावर उपचार शक्य आहे.

त्याकरिता शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून ह्रदयविकारावर जनजागृतीची गरज आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुलांमध्ये आढळणारे ह्रदयविकाराचे प्रकार

  • मुलांच्य ह्रदयामध्ये छिद्र
  • ह्रदयाच्या झडपांमध्ये समस्या
  • ह्रदयाच्या चार कप्प्यांपैकी एखादा कप्पा नसणे
  • शुद्ध- अशुद्ध रक्ताची सरमिसळ

ह्रदयविकार असलेल्या मुलांतील २५ टक्के मुलांनाच शस्त्रक्रियेची गरज भासते. इतर मुले औषधोपचारानेच बरे होतात. वेळीच आजाराचे निदान होवून उपचार झाल्यास हा रुग्ण पूर्णपने बरा होतो. सध्या ह्रदयात छिद्र आढळणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात अद्यापही अनेकांना याबाबत माहितीच राहत नाही. वेळीच उपचारानेच या आजारावर नियंत्रण शक्य आहे.

डॉ. सुनील वाशिमकर, नवनियुक्त अध्यक्ष, कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ शाखा