डॉ. रवी कलसाईतांच्या संशोधनाने हृदयातील अडथळे दूर

हृदयात अडथळे असल्याचे डॉक्टरांनी कुणाला सांगितले, तर त्याच्या मनात धडकीच भरते. या रुग्णाला एन्जिओप्लास्टी करून स्टेन टाकण्यासह बायपास सर्जरी व विविध महागडे उपचार सुचवले जातात, परंतु नागपूरच्या एका सहायक प्राध्यापकाने दुधीतील विविध घटकांवर सूक्ष्म अभ्यास करून त्यात दुधीतील ‘प्लैंट स्टेरॉल्स’ या घटकाने हृदयातील अडथळे दूर होणे शक्य असल्याचे पुढे आले. त्याकरिता पांढऱ्या उंदरांवर केलेला अभ्यासही यशस्वी झाला. ही बाब आंतराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्येही नोंदवली गेली आहे.

भारतात प्राचीन काळापासून दुधीची भाजी आणि रस हा हृदयरुग्णांकरिता फायद्याचा असल्याचे बोलले जाते. वेगवेगळ्या रुग्णांना दुधीचा रस घेण्यास सांगितले जाते, परंतु त्यातील कोणते तत्त्व हृदयासाठी फायद्याचे आहे, त्याचे ह्रदयावर होणारे परिणाम होतात, याबाबत तंत्रशुद्ध माहितीचा अभ्यास फार कमी संशोधनात झाला आहे. या दुधीवर नागपूरजवळच्या कामठीतील श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीतील डॉ. रवी कलसाईत या सहायक प्राध्यापकाने सतत ७ वर्षे संशोधन केले. त्यात दुधीत ‘प्लैंट स्टेरॉल्स’ हा महत्त्वाचा घटक असल्याचे पुढे आले. दुधीतील हा घटक काढून तो रुग्णांना दिल्या गेल्यास मोठय़ा प्रमाणात लाभ होणे शक्य असल्याचेही त्यातून पुढे आले. संशोधनाचा भाग म्हणून डॉ. कलसाईत यांनी दुधीचा रस हा मिथेनॉल आणि पाणी अशा दोन्ही स्वरूपात वेगळा काढला. हा रस पांढऱ्या उंदरांना दिल्या गेला. प्रयोगातील निष्कर्षांत हे रस पिल्यावर उंदरातील लिपिड प्रोफाईलमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुधारणा झाल्याचे पुढे आले. त्यात उंदरातील कॅ लेस्टेरॉल कमी झाले असून उंदरात असलेल्या काही प्रमाणातील ह्रदयाचे अडथळेही दूर झाल्याचे पुढे आले. त्यातील दुसऱ्या प्रयोगानुसार दुधीतील केवळ ‘प्लैंट स्टेरॉल्स’ हा एकच घटक वेगळा काढल्या गेला. हा घटक उंदरांना दिल्या गेला. त्यात उंदरांना पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत जास्त लाभ झाल्याचे पुढे आले. त्यात उंदरातील कॅलेस्ट्रेरॉल व अडथळे पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत जास्त प्रमाणात कमी झाले.

प्रयोग यशस्वी झाल्यावर डॉ. कलसाईतांनी अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासन विभागात दुधीसह ‘प्लैंट स्टेरॉल्स’वर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तेथील वैद्यकीय जर्नलमध्ये प्लैंट स्टेरॉल्स असलेल्या वनस्पतींचे सेवन केल्यास हृदयरुग्णांना मोठय़ा प्रमाणात लाभ होत असल्याचे नमूद असल्याचे निदर्शनात आले. तेव्हा त्यांनी काही हृदरुग्णांना दुधीचे सेवन करण्याचा सल्ला देत त्याचे निरीक्षण केले. याप्रसंगी मोठय़ा प्रमाणावर रुग्णांना लाभ झाल्याचे पुढे आले. संशोधनातील यश बघून या विषयात आणखी मोठय़ा प्रमाणात काम झाल्यास ते नागपूरच नव्हे, तर संपूर्ण जगातील हृदयरुग्णांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जाते. नागपुरात केलेल्या या संशोधनाकरिता त्यांनी डॉ. अशोक सावजी आणि डॉ. के.पी. भुसारी यांचेही मार्गदर्शन घेतले.पेटंट कार्यालयात नोंदणी

या संशोधनाची डॉ. रवी कलसाईत यांनी इंडियन पेटंट कार्यालयात नोंदणी केली आहे. दुधीतील प्लैंट स्टेरॉल्स वेगळे करण्याकरिता त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई येथील उपकरणांचा वापर केला.

दोन महिन्यांत ६० टक्के अडथळे दूर

अशा रुग्णाने दुधीचा रस सतत ६० ते ७० दिवस घेतल्यास त्याच्या हृदयातील अडथळे सुमारे ६० टक्के कमी होणे शक्य आहे. तसे झाल्यास रुग्णाची एन्जिओग्राफीसह बायपास सर्जरी टळू शकते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर खर्च वाचतो. दुधीची भाजी सलग मिळणे शक्य नसल्याने त्याची भुकटी तयार करावी. ती दिवसातून सकाळी व रात्री अशी नित्याने दोन वेळा घेतल्यास रुग्णाला मोठा लाभ होतो, अशी माहिती डॉ. रवी कलसाईत यांनी दिली.