मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर कोसळणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसाने आता विदर्भातही जोरदार प्रवेश केला आहे. विदर्भात सर्वाधिक पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात आहे. शनिवारपासून सुरू झालेला पावसाचा जोर वाढतच असून आणखी दोन दिवस हा जोर कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस आहे. विशेषत: मान्सूनचा जोर दाखवणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात परतीचा पाऊसदेखील त्याच वेगात आहे. या जिल्ह्यात तासाभरात ६० मिलिमिटर या वेगाने पाऊस पडला. सूर्य दक्षिण गोलार्धात प्रवेश करत असतानाच पाऊसही परत जात आहे. उत्तर भारताकडून पाऊस परतण्यास सुरुवात झाली आहे. आता मध्य भारतात म्हणजेच, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि विदर्भात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने येथेही परतीच्या पावसाची सुरुवात झाली आहे. हा शेवटचा पाऊसही असू शकेल. यानंतर ऑक्टोबरमध्ये पाऊस येऊ शकतो, पण त्याची निश्चिती नाही.

साधारपणे परतीचा पाऊस सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असतो. हवामान खात्याने मात्र ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत परतीचा पाऊस राहील, असे संकेत दिले आहेत.