चाकरमान्यांच्या खिशावर ताण; पर्यायी मार्ग ठरले कोंडीची ठिकाणे

सिमेंट रस्ते असो किंवा मेट्रो रेल्वेचे बांधकाम यासाठी निवडण्यात आलेले पर्यायी मार्ग जेवढे जीवघेणे आहेत, तेवढेच वाहतूक कोंडी करणारे आहेत. या मार्गावर वर्दळीच्या वेळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पेट्रोलच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाल्याची तक्रार सर्वसामान्य चाकरमानी करू लागले आहेत. दुर्दैवाने या विरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही, उलट विकासाच्या नावाने सुरू असलेल्या उदोउदोमुळे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.

शहरातील सार्वजनिक वाहतूक कोलमडलेली आणि अपुरी साधने असल्याने नागरिकांना स्वत:च्या वाहनांशिवाय पर्याय नाही, यातच सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतीमुळे त्यांची कंबरमोड झाली आहे. वाढत्या महागाईच्या झळा सोसतच दुचाकीने प्रवास करणारे चाकरमानी असो किंवा शिकवणी वर्गाला जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी असो, स्कूल बस, व्हॅन या सर्वानाच या वाढत्या पेट्रोल खर्चामुळे चिंतेत टाकले आहे.

यासाठी शहरातील वाहतूक कोंडी हे प्रमुख कारण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिन्याला हजार ते पंधराशेवर होणारा खर्च आता दुप्पटीने वाढल्याचा दावा चाकरमानी करू लागले आहे.

सध्या मेट्रोचे काम वर्धा, हिंगणा, सेन्ट्रल अ‍ॅव्हेन्यू, सीताबर्डी, धंतोली आणि इतरही ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांच्या कामासाठीही वाहतूक वळवण्यात आली आहे. गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्रोत्सव आणि दसरा या उत्सव काळासह इतरही दिवशी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ६ ते ८ या वर्दळीच्या वेळी सर्व मार्गावर वाहतूककोंडीचे चित्र असते. विशेषत: पर्यायी मार्गावरची वाहतूक तर कमालीच्या संथगतीने पुढे सरकत असते. शहरात येणाऱ्या क्रेन्स, आठ ते सोळा चाकी ट्रक, इतरही मोठी जड वाहने यामुळे कोंडीत भर पडते. दहा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा-अर्धा तास लागतो.

यामुळे पेट्रोल आणि वेळेचा अपव्यय होतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, पर्यायी मार्ग निवडताना वाहन संख्येचा अभ्यास केला गेला नसल्याचे दिसून येते.

अजनी चौक ते रहाटे कॉलनी

मेट्रोच्या कामासाठी वर्धा मार्गावरील अजनी चौकात वर्धेकडून येणारी वाहने हनुमान मंदिराकडून वळवली जातात. येथे खामल्याकडून येणारा रस्ताही जोडला जातो. विरुद्ध बाजूनेही येणाऱ्या वाहनांची गर्दी असते. मुळातच हा मार्ग अरुंद आहे. शिवाय येथे रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहने उभी केली जातात. अतिक्रमण आहेच. अशात येथे दररोज वर्दळीच्या काळात वाहतूक कोंडी होते. पुढे सिग्नल आहे. तो बंद असल्यास सर्व वाहने खोळंबून पडतात. ही कोंडी नीरी कार्यालय, जिल्हा मध्यवती कारागृहापर्यंत राहते.

सिंचन कार्यालय ते अजनी चौक

सिंचन कार्यालय ते अजनी चौक या दरम्यान सिमेंट रस्त्याच्या कामासाठी सध्या येथे एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. (दसऱ्यापासून दुसरा मार्ग अर्धवट सुरू करण्यात आला आहे.) हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला एफसीआय गोदामात येणारे ट्रक उभे असतात. हा रस्ता जुने आणि नवीन नागपूरला जोडणारा असल्याने यावर वाहनांची तशीही गर्दी असते. तो संपूर्ण भार आता एकेरी मार्गावर आल्याने हा रस्ताही पार करताना कमालीचा वेळ जातो.

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवरही कोंडी

सेंट्रल अ‍ॅव्हेन्यू हा तर कायम वर्दळीचाच मार्ग आहे. मेट्रोच्या कामामुळे त्यात आणखी भर पडली आहे. गांधीबाग चौक, मेयो चौक, रेल्वेस्थानक चौक ही कोंडीची ठिकाणे झाली आहेत.

पटेल चौक ते बैद्यनाथ चौक

ग्रेटनाग रोडवरील पटेल चौकातून कॉटन मार्केटकडे जाणारा रस्ता बंद करून इमामवाडा पोलीस ठाण्याजवळील रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आल्यापासून दुपारची वेळ सोडली तर येथे कायम वाहनांच्या रांगा असतात. सायंकाळी पोलीस वाहतूक नियंत्रित करीत असले तरी वाहनांची संख्याच इतकी असते की कोणीही कोंडी टाळू शकत नाही. येथून वाहने काढणे तारेवरची कसरत असून दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

कार ऐवजी दुचाकी

दररोज होणाऱ्या त्रासामुळे आता कार ऐवजी दुचाकीने जातो, त्यामुळेच कार्यालयात वेळेत पोहोचणे शक्य आहे, असे दत्तात्रय नगरातील उमेश कडू म्हणाले. कार्यालयातून येताना आणि जाताना इमामवाडा पोलीस स्थानकाजवळ लागणारा वेळ संताप वाढवणारा असतो. चिडचिड होते पण बोलायचे कोणाला, असे ते म्हणाले.

एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक

मेट्रोच्या कामासाठी रात्री वर्धा मार्गावर अनेक ठिकाणी एका बाजूने रस्ता बंद करून दुसऱ्या बाजूच्या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू केली जाते. हा जीवघेणा खेळ आता नित्याचाच झाला आहे. सोमलवाडा चौक, प्राईड चौकात अरुंद रस्त्यावरही वाहने उभी केली जातात. त्यातच कंटनेर घेऊन येणारी वाहने येथून सोडली जातात. एक कंटेनर फसला की दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागते. नंतर संथगतीने वाहने पुढे सरकतात.

कामाच्या गतीचे कौतुक, त्रासाचे काय

मेट्रोच्या गतीने होणाऱ्या कामाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीरपणे केले. मात्र, दोन वर्षांपासून या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी अवाक्षरही काढले नाही. वाहनधारकांवर बसणाऱ्या अतिरिक्त खर्चाच्या भरुदडाबाबतही कोणी बोलले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पेट्रोलचा खर्च दुप्पटीने वाढला

मेट्रोच्या कामामुळे वर्धा मार्गावर होत असलेल्या वाहनकोंडीमुळे पेट्रोलच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाल्याची प्रतिक्रिया सोमलवाडय़ात राहणारे रवींद्र ठाकरे यांनी दिली. एरवी सिव्हिल लाईनमधील कार्यालयात जाणे-येणे आणि इतरही कामे करताना महिन्याला दीड हजार रुपयांच्या आसपास खर्च येत होता. पाचशे रुपयांचे पेट्रोल आठवडाभर पुरत होते. आता तीन दिवसानेच टाकावे लागते, असे ते म्हणाले.

विक्रीत वाढ प्रतिबिंबित होत नाही

सणासुदीचा काळ आणि उन्हाळ्यात लग्नाच्या हंगामात सामन्यपणे पेट्रोच्या विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून येते. मात्र, वाहतूक कोडींमुळे विक्रीत वाढ झाल्याचे प्रतिबिंबित होत नाही. विशिष्ट भागातील पंपावरच ही बाब कळू शकेल.

– प्रणय पराते, सचिव विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन, नागपूर</strong>

शहरातील वाहनांची संख्या

दुचाकी वाहने   – ११.५० लाख

चारचाकी वाहने- १.२५ लाख

परवानाधारक – १२,५६७

ऑटोरिक्षा