पोलिसांचे ढिसाळ नियोजन; १० मिनिटाच्या प्रवासाला एक तास; सीताबर्डी, धंतोली स्थानक कोंडीत

हिवाळी अधिवेशन काळात शहरातील सीताबर्डी, सदर, धंतोली आणि रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीची व्यवस्था विस्कळीत होत असल्याचा अनुभव नागपूरकरांना आहे. मात्र, यंदा पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील बहुतांश भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे जाण्यास दहा मिनीट लागत असताना त्याला एक ते दीड तासांचा वेळ गेला.

हिवाळी अधिवेशन काळात नागपुरात सरकार असते. या काळात शहरात मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते, समस्या घेऊन येणारे मोर्चेकरी आणि शासन दरबारी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची गर्दी शहरात होते. वाहनांच्या संख्येत वाढ होते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते, परंतु आजवर सीताबर्डी, धंतोली, सदर, सिव्हिल लाईन्स आणि रेल्वेस्थानक परिसरात ट्रॅफिक जाम होत होते, मात्र यंदा पोलिसांनी मोर्चा निघण्याच्या ठिकाणात बदल केला आहे.

आता मोर्चे यशवंत स्टेडियम, कॉटन मार्केट परिसर, गणेश टेकडी परिसर, सदर यासह मेडिकल चौकातून निघण्याची व्यवस्था केली. मेडिकल चौकातील राजाबाक्षा मंदिर परिसरातील मैदानावर मोर्चे थांबणे आणि निघण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे मेडिकल, उंटखाना, अजनी, बैद्यनाथ चौक, मोक्षधाम चौक, कॉटन मार्केट चौक, गणेशपेठ बसस्थानक, मेयो चौक, मानस चौक, जयस्तंभ चौक, एलआयसी चौक, गड्डीगोदाम, सदर, छावणी, जपानी गार्डन चौक, सिव्हिल लाईन्स, महाराजबाग चौक, बोले पेट्रोल पंप चौक, सेन्ट्रल मॉल चौक, काचीपुरा चौक, दीक्षाभूमी टी-पॉईंट, अजनी आदी भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या. अर्धा-अर्धा तास वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याचे सोमवारी दिसले. वाहतूक व्यवस्था सांभाळताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. वाहतूक पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे हा फटका बसल्याचा आरोप होऊ लागला आहे.

विधिमंडळ परिसरात पार्किंगची समस्या

विधिमंडळ परिसरात सर्व वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षापासून ते राज्यमंत्र्यांपर्यंत सर्वाची वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आली. त्यामुळे परिसरात राजकीय पुढारी आणि इतरांना वाहने पार्क करण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागली. विधिमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवून दिल्याप्रमाणेही वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. अधिकाऱ्यांची आणि इतर वाहनांना कस्तुरचंद पार्क येथे जागा देण्यात आली आहे, परंतु पत्रकारांना मध्यवर्ती संग्रहालय परिसरात जागा दिलेली असताना पोलिसांनी पत्रकारांच्या गाडय़ा आतमध्ये सोडलेल्या नाहीत. त्यामुळे वाहने पार्किंगची समस्या भेडसावली. ठरल्याप्रमाणे पत्रकारांना मध्यवर्ती संग्रहालय आणि एलआयसी निवासी वसाहत परिसरात पार्किंग करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याचे प्रयत्न

शहरातील वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी ८० अधिकारी व ४९५ कर्मचारी अशा एकूण ५७६ पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे, परंतु अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने लोकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलीस व्यवस्था सांभाळण्यात व्यस्त असून वरिष्ठ पोलीस अधिकारीही रस्त्यावर आहेत. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

– स्मार्तना पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त