विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशिर

उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला (बारावी) मंगळवारपासून सुरुवात झाली असून तब्बल १ लक्ष ८० हजार विद्यार्थ्यांनी ४३६ केंद्रांवर परीक्षा दिली. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या नागपूर जिल्ह्य़ातील मुलांना परीक्षा केंद्रांवर येताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात प्रामुख्याने शहरात सुरू असलेली विकास कामे आणि हेल्मेट सक्तीने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला तरीपण परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचूनही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची मुभा दिली. ही परीक्षा २५ मार्चपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे.

नागपूर विभागातून नागपूर जिल्ह्य़ात सर्वात जास्त ७१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. त्यामुळे सर्वात जास्त विद्यार्थी नागपूरचेच होते. शहरात ७० आणि नागपूर ग्रामीणमध्ये ७५ परीक्षा केंद्र होती.

त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांना लांबून परीक्षा केंद्रावर यायचे होते. अशा विद्यार्थ्यांना शहरातील विकास कामांमुळे परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचता आले नाही. सकाळी ११ ते दुपारी २ अशी पेपरची वेळ होती आणि पहिलाच पेपर इंग्रजीचा होता.

त्यामुळेही विद्यार्थ्यांना धाकधूक होतीच. सकाळी दहा, साडेदहाच्या सुमारास सर्वाचीच कामाच्या ठिकाणी जाण्याची घाई असल्याने गर्दीही खूप असते. म्हणूनच विद्यार्थ्यांनी एक तासापूर्वी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन दोन दिवसांपूर्वीच नागपूर विभागीय मंडळाच्यावतीने करण्यात आले होते. तरीही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झालाच.

मात्र, नागपूर विभागीय मंडळाने नरमाई घेऊन अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्याचे मंडळाचे सचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्य़ातून २०,३२३, चंद्रपुरातून ३१ हजार ९९६, नागपुरातून ७१ हजार २६६, वर्धा जिल्ह्य़ातून १९ हजार ९४९, गडचिरोलीतून १४ हजार २५३ आणि गोंदिया जिल्ह्य़ातून २३ हजार २१३ असे १ लक्ष ८० हजार २०० विद्यार्थी संख्या होती. त्यात मुलींची संख्या ८८ हजार ७३६ एवढी होती. दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांना हेल्मेट नसल्याने अडचणी गेल्या. काही चौकांमध्ये विद्यार्थ्यांच्या दुचाकीचे फोटो वाहतूक पोलिसांनी घेतले. तेव्हा विद्यार्थी गयावया करीत होते. नंतर विद्यार्थ्यांना त्यांनी जाऊ दिले.

माहिती तंत्रज्ञानासाठी १,११,०७० विद्यार्थ्यांची नोंदणी

प्रचलित पद्धतीप्रमाणे ‘माहिती तंत्रज्ञान’ आणि ‘सामान्य विज्ञान’ या विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. माहिती तंत्रज्ञानासाठी १,११,०७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १ हजार ३४६ केंद्रांवरून परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत. तसेच सामान्य ज्ञान या विषयासाठी १ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ४२ केंद्रांवरून विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत.

असाही गोंधळ

बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होतीच. शिवाय विकास कामांमुळेही परीक्षा केंद्रावर ते उशिरा पोहोचले. पण महिला महाविद्यालय आणि धरमपेठ कॉलेज यामध्ये त्यांची गफलत झाली. विद्यार्थी विचारताना महिला महाविद्यालय विचारत नंदनवन भाग, सक्करदरा या भागात वेगवेगळ्या नावाने महिला महाविद्यालये आहेत. त्यामुळे भरल्याच महिला महाविद्यालयांमध्ये पोहोचल्याची उदाहरणे आहेत. तसेच धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, धरमपेठ हायस्कूल आणि धरमपेठ कन्या शाळा अशीही परीक्षार्थीची गफलत झाली. त्यामुळेही विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकले नाहीत, असे शिक्षण मंडळाचे सहसचिव श्रीराम चव्हाण यांनी सांगितले.

 

* एकूण मुले- ९१,४६४

* एकूण मुली- ८८,७३६

* विज्ञान शाखा- ७१,२०९

* कला शाखा ७५,९२६

* वाणिज्य शाखा २४,१६५

* एमसीव्हीसी- ८९००