स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची भूमिका
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत, त्या पक्षाच्या चिन्हांवरच लढविल्या जातील असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वबळावर या निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने इच्छा व्यक्त केल्यासच त्यांच्याशी युती करण्याचा विचार केला जाईल व याबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार असेल, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भातील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी तटकरे नागपूरमध्ये आले होते. त्यांनी जिल्हानिहाय कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख आणि इतरही प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यात जास्तीत जास्त यश मिळविण्यासाठी बुथ पातळीवरून प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पत्रकार भवनात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या चिन्हांवर या निवडणुका लढविण्यात येतील. कोणत्याही स्थानिक आघाडीसोबत पक्ष जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत युती करणार काय? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, काँग्रेसने इच्छा व्यक्त केली तर आम्ही याबाबत विचार करू, या संदर्भातील अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते, ते आता बाजूला करून नव्याने कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या छोटय़ा सार्वत्रिक निवडणुकाच आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पत्रकार परिषदेला माजी मंत्री व शहर अध्यक्ष अनिल देशमुख, ग्रामीणचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

पराभवाच्या भीतीमुळे चार सदस्यांचा प्रभाग
थेट निवडणुकीत जिंकता येणे शक्य नाही हे लक्षात आल्यावरच भाजप-सेना सरकारने निवडणूक पद्धतीत बदल केला आहे, अशी टीका तटकरे यांनी चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या निर्णयावर केली. सत्तेत आल्यावर या सरकारने एक सदस्यीय पद्धतीने निवडणुकीचा कायदा केला. मात्र, पालिका निवडणुकीत पराभव झाल्याने हा निर्णय बदलला आणि आता बहुसदस्यीय प्रभाग केला आहे. विधानसभा मतदारसंघाच्या ४० टक्के भाग एका प्रभागात येणार आहे, असे तटकरे म्हणाले.

ही तर कायदा व सुव्यस्था ढासळल्याची कबुलीच
अंतर्गत सुरक्षेसाठी गृहखात्याने तयार केलेला मसुदा हा राज्यात कायदा व सुव्यवस्था किती ढासळली आहे याची अप्रत्यक्ष कबुली देणारा आहे. हा कायदा घातक असून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. मुळात असा कायदा आणण्याची गरजच का भासली याचा जाब आम्ही विधिमंडळाच्या अधिवेशनाच विचारू, असे तटकरे म्हणाले.