अतिक्रमण हटवून नागरिकांसाठी उद्यान खुले

कुकडे लेआऊट परिसरातील नागपूर सुधार प्रन्यासच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सार्वजनिक जागेवर गेल्या दोन वर्षांंपासून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संतोष वर्मा या व्यक्तीने अतिक्रमण करून गो शाळेच्या नावावर जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला असता नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कारवाई करून बंदिस्त करण्यात आलेल्या गायींना सोडण्यात आले आणि परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण तोडण्यात येऊन बंदिस्त असलेले उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले.

कुही तालुक्यातील सिल्ली गावातील गोरक्षकांचे प्रकरण समोर आले असताना शहरात कुकडे लेआऊट परिसरात संतोष वर्मा या व्यक्तीने नासुप्रच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान असलेल्या सरकारी जागेवर गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बेवारस गायी आणून त्या ठिकाणी गो शाळा निर्माण करून ती जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीस आणले. या उद्यानात असमाजिक तत्त्वाचा धुमाकूळ असायचा. त्यामुळे तीन वर्षांपूवी या उद्यानाच्या भोवती भिंत बांधून त्याला दोन प्रवेशद्वार बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांंपासून उद्यानाचे मैदान झाले असून त्या भागात राहत असलेल्या संतोष वर्मा याने त्या उद्यानाचा ताबा घेत बेवारस जनावर ठेवणे सुरू केले.

या परिसरात वर्मा याची दहशत असल्यामुळे त्याच्या विरोधात कोणी समोर येऊन बोलत नव्हते. त्यामुळे तो उद्यानावर स्वत:ची मालकी दाखवित त्यावर कब्जा करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला होता. सकाळी जनावरांना चारा दिल्यानंतर दिवसभर उद्यानाच्या दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावत स्वत:चे कार्यकर्ते उद्यान परिसरात उभे ठेवत होता. संतोष वर्मा यांच्यामागे गुंड प्रवृत्तीचे अनेक कार्यकर्ते असल्यामुळे त्यासोबत कोणीही पंगा घेत नव्हते. परिसरात फेरफटका मारला असता संतोष वर्मा विषयी काही विचारू नका, अशी प्रतिक्रिया परिसरातील अनेकजण व्यक्त करीत होते.

प्रकरण उघडकीस आल्यावर नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बुधवारी सकाळी उद्यानाला भेट दिली असताना त्या ठिकाणी त्यांना २५ ते ३० गायी दिसून आल्या आणि दोन्ही दरवाज्याला कुलूप लागले होते. संतोष वर्मा याचे कार्यकर्ते आणि तो परिसरात होता. यावेळी नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करत उद्यानाच्या दोन्ही दरवाजाचे कुलूप तोडले आणि बंदिस्त करून ठेवण्यात आलेल्या गायींना सोडण्यात आले. करण्यात आलेले अतिक्रमण तोडून उद्यानाची साफसफाई करून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले. ही कारवाई होत असताना संतोष वर्माने काही राजकीय नेत्यांना फोन केल्याची माहिती समोर आली मात्र, त्याला कोणीच प्रतिसाद न दिल्याने कारवाई सुरू असताना पसार झाल्याचे समोर आले.

वर्माला आशीर्वाद कोणाचा

गेल्या दोन वर्षांपासून संतोष वर्माने या उद्यानावर कब्जा केला असताना नासुप्रने त्यावर आजपर्यंत कारवाई का केली नाही. त्याला कोणाचा आशीर्वाद आहे. भाजपचा कार्यकर्ता असून मुख्यमंत्री माझे जवळचे मित्र असल्याचे तो लोकांना सांगतो मात्र, तो भाजपचा असेल तर कोणता नेता त्याच्या मागे आहे. संतोष वर्मा हा बिल्डर असून त्या परिसरात त्यांची दहशत असल्यामुळे त्या भागातील लोक त्यांच्या विरोधात बोलत नाहीत. त्याच्या विरोधात कोणी तक्रार केली तर तक्रार करणाऱ्याला गुंडाच्या हातून धमकी देत मारहाण केली असल्याचा घटना समोर आल्या आहेत.