आरोग्याच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किमान स्वच्छ ठिकाणी असावी हा सर्वविदित नियम शहरातील बहुतांश मॉल्समध्ये गुंडाळून ठेवण्यात आला असून, चक्क स्वच्छता गृहात (वॉशरुम) ही व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी ‘टॉयलेट’ची व्यवस्था एकाच ठिकाणी समोरासामोर असून सुरक्षा आणि संकोच या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
ग्राहक हा खरे तर कुठल्याही व्यवसायाचा कणा मानला जातो. मॉल संस्कृतीही त्याला अपवाद नाही. सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृह या दोन प्राथमिक गरजांची पूर्तता करणे सर्वासाठीच बंधनकारक आहे. मॉल्समध्ये याचे पालन केले जात असले तरी ते खरच ग्राहक सुविधेच्या पातळीवर खरे उतरले आहे का असा प्रश्न पडावा अशी स्थिती शहरातील रामदासपेठ, शुक्रवारी तलाव, बर्डी आणि अलंकार चित्रपटगृहाजवळील मॉल्ससह इतरही काही छोटय़ा-मोठय़ा मॉल्सची पाहणी केल्यावर निदर्शनास येते. वरील चारही मोठय़ा मॉल्समध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चक्क ‘वॉश रुम’मध्ये करण्यात आली आहे. आजूबाजूने महिला आणि पुरुषांचे ‘टॉयलेट्स’ आणि मध्ये ‘वॉटर कुलर’असे सार्वत्रिक चित्र आहे. शुक्रवारी तलावाजवळील एका जुन्या कापड गिरणीच्या नावाने असणाऱ्या अतिभव्य मॉलमधील प्रत्येक माळ्यावरील ‘वॉश रुम’मधील पाण्याची व्यवस्था तर धक्कादायक म्हणावी अशीच आहे. तेथे येणारा मुतारीचा दर्प सार्वजनिक शौचालयालाही लाजविणारा आहे. इतर ठिकाणी ‘दर्प’ येत नसला तरी पाणी मात्र वॉशरुममध्येच आहे. अनेक साथीच्या रोगांची सुरुवात पिण्याच्या पाण्यातून होते सर्वविदित आहे. मॉल्समध्ये येणारा ग्राहक हा उच्चमध्यमवर्गीय आणि शिक्षितच असतो. त्यांच्यासोबत छोटी मुलेही असतात, त्यांना मुतारीजवळील पाणी पाजावे का असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. एक तर घरून पाणी घेऊन जा किंवा ते खरेदी तरी करा एवढाच पर्याय शिल्लक उरतो.

पाण्यासाठी शोधाशोध
मोठ-मोठय़ा मॉल्समध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंची रेलचेल आहे. कुठल्या वस्तू कुठे मिळतील यासाठी सूचना फलकही टांगलेले आहेत. मात्र पाणी कोठे मिळेल याबाबत कुठेच सूचना फलक नाहीत. पाण्याची विचारणा केली तर वॉशरुमकडे पाठविले जाते. छोटय़ा मॉल्समध्ये एकाबाजूकडून दुसरीकडे जाणे अवघड नाही, पण मोठय़ा मॉल्समध्ये हातात सामान घेऊन पाणी शोधणे ग्राहकांसाठी त्यांचे रक्त आटवणारी बाब ठरते. अलंकार चित्रपटगृहाजवळील मॉल्समध्ये वॉटर कुलरजवळ प्लॅस्टिकचे ग्लास ठेवण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी तलावाजळील मॉलमध्ये तर ते सुद्धा नाही. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर फक्त वॉटरकुलर आहे. ग्लास नाही. मळकटलेले छोटी प्लॅस्टिकची बाटली तेथे ठेवली आहे. तिच्याकडे पाहून तहानलेल्या कोणाचीही पाणी पिण्याची इच्छा होणार नाही. रामदासपेठमधील ‘बाझार’मधील तर वॉटरकुलरने ‘हे राम’च म्हटला आहे.

स्वच्छतागृहात महिला सुरक्षेची अबाळ

जवळपास सर्वच मॉल्समध्ये प्रत्येक माळ्यावर स्वच्छता गृहे (वॉशरुम्स) असली तरी महिला आणि पुरुषांना तेथे एकाच दारातून प्रवेश करावा लागतो. शुक्रवारी तलावाजवळील मॉलमध्ये प्रथम महिलांचे व नंतर पुरुषांसाठी व्यवस्था केली आहे. पण प्रत्येक माळ्यवर एका कोपऱ्यात असलेले हे वॉशरुम तेथील व्यवस्थेमुळे महिलांसाठी असुरक्षित ठरले आहे. कुठेही सुरक्षा रक्षक नसतो. अलंकार सिनेमागृहाजवळील आणि रामदासपेठेतील मॉल्समध्ये पुरुष आणि महिला टॉयलेट्सची दारे समोरासमोर आहेत. त्यामुळे तेथे जाण्यास महिलांना संकोच होतो. ‘बिग’म्हणून ओळख असलेल्या बाजारात तर टॉयलेट्सवरच अतिक्रमण करून तेथे चक्क भांडारगृह तयार करण्यात आले आहे. तेथे कर्मचाऱ्यांचे छोटेखानी कार्यालयही आहे.
(क्रमश:)