पैसे परत घेण्यासाठी प्रवाशांची पायपीट

निश्चलनीकरणानंतर पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी तिकीट खरेदी करून नंतर रद्द करणाऱ्या शेकडो प्रवाशांना सहा महिन्यांचा काळ लोटून गेला तरी रेल्वेने रक्कम परत केलेली नाही. त्यासाठी प्रवाशांना रेल्वे कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत.

मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला निश्चलनीकरणाचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर लांब पल्ल्याचे तिकीट घेण्याचे आणि त्या रद्द करण्याचे प्रमाण वाढल्याचे काही शहरात आढळून आले. अशाप्रकारे काळा पैसा पांढरा केला जात असल्याचे दिसून आल्यावर रेल्वेने पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांद्वारे तिकिटे खरेदी केल्यानंतर त्या रद्द केल्यास पैसे परत करण्यासाठी टीडीआर ‘तिकीट डिपॉझिट रिसिप्ट’ भरण्याचे बंधकारक केले. त्यानुसार तिकीट रद्द करणाऱ्याला बँक खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या सत्यप्रती तिकीट खिडकीवर आणि टीडीआरसोबत जोडून मुंबई मुख्यालयाकडे पाठवण्याची सक्ती केली. संबंधित खाते कगदपत्राची सत्यता पडताळून प्रवाशांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे जाहीर केले. या गोष्टीला आता सात महिने झाले आहेत. प्रारंभी दहा हजार आणि नंतर पाच हजार रुपयांच्या तिकिटांसाठी हा नियम लागू करण्यात आला. जुन्या नोटावर तिकीट विक्री बंद होऊनही पाच महिने झाले आहे, परंतु टीडीआर भरणाऱ्या ९० टक्के प्रवाशांना अजूनही त्यांची रक्कम परत करण्यास रेल्वे प्रशासन असमर्थ ठरले आहे.

नोटाबंदीनंतरच्या चार महिन्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ८४ लाख १५ हजार ८५५ रुपयांचे टीडीआर भरून पाठवण्यात आले. यामध्ये पाच हजार रुपायांपेक्षा अधिक रक्कम परत मागणाऱ्यांची संख्या ६२८ एवढी आहे. यातील किती प्रवाशांना रक्कम परत करण्यात आली. हे रेल्वेलाही सांगणे कठीण जात आहे.

जुन्या नोटांनी पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे तिकीट खरेदी करून ते रद्द करणाऱ्यांना रोख रक्कम बंद करण्याचे जाहीर केले होते. त्याऐवजी प्रवाशाला तिकीट रद्द केल्याच्या ३० दिवसात टीडीआर भरून टपालाद्वारे मुख्यालयातील रेल्वे दावा प्राधिकरणात जमा करावा लागतो. त्यानंतर ९० दिवसात संबंधित प्रवाशाच्या त्याच्या पत्त्यावर रक्कम परतीचा धनादेश किंवा त्यांच्या बँक खात्यावर ईसीएस माध्यमातून रक्कम जमा केली जाते. हा धनादेश बँक खात्यामार्फत वटवला जातो. नोव्हेंबर महिन्यात पाच हजार आणि त्यापेक्षा जास्त रुपयांचे तिकीट घेणारे आणि तिकीट रद्द करणाऱ्यांनी रेल्वेच्या नियमानुसार टीडीआर भरून पाठवला, परंतु रक्कम परत मिळालेली नाही. त्यासंदर्भातील तक्रार रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयातील वाणिज्य खात्याकडे रोज येत आहेत. यासंदर्भात अनेक प्रवाशांनी माहिती अधिकार कायद्यात तपशील देखील मागितला आहे.

तांत्रिक अडचण आल्यास टीडीआर

नोटाबंदीनंतर रेल्वे तिकीट आरक्षण करण्यासाठी ‘डेबिट/क्रेडिट कार्ड स्व्ॉप’ करण्याचा पर्याय दिला आहे. कार्ड पेमेंटने तिकीट खरेदी करून काही कारणास्तव ते रद्द केल्यास ‘पीओएस’ यंत्रणाद्वारे रक्कम परत करण्याची सुविधा आहे, परंतु अनेकदा पैसे परत करण्यात अडचणी येत आहे. त्यांना देखील ‘डीटीआर’ पर्याय दिला जात आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत.

जुन्या नोटाने ४१,२२० रुपयांचे तिकीट

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात निश्चलनीकरणाच्या काळात एका प्रवाशाने जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाने ४१ हजार २२० रुपयांचे तिकीट खरेदी केले. नोव्हेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या ८४ लाख १५ हजार ८५५ रुपयांची रक्कम टीडीआरमार्फत करण्याची विनंती करण्यात आली आहे.