भारतीय शिक्षण मंडळाची ११ ते १३ फेब्रुवारीला ‘पुनरुत्थानासाठी संशोधन’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद

गत काळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी..या कुसुमाग्रजांच्या कवितेचे एकीकडे उदात्तीकरण करायचे आणि दुसरीकडे पुराणातील अतार्किक वांगी आणून तंत्रज्ञानाच्या गोष्टी करायच्या अशी विक्षिप्त, विकृत विचारसरणी सध्या देशभर पेरली जात असून नागपूरही त्याला अपवाद नाही. भारतीय शिक्षण मंडळाच्यावतीने येत्या ११ ते १३ फेब्रुवारीला व्हीएनआयटीमध्ये ‘पुनरुत्थानासाठी संशोधन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होऊ घातली असली तरी १८५७च्या पूर्वीच्या ‘पाठशालां’ची व्यवस्था परत रुजवण्याचाच हा प्रयत्न असून त्याला भारतीय संस्कृतीचा मुलामा दिला जात आहे. देशाटन करणे किंवा समुद्र ओलांडणे हे ज्या काळात पाप समजले जात होते. त्या काळात पुष्पक विमान निर्माण करण्याची गरज कशी पडली, असा प्रश्न कोणाही बुद्धिवाद्याला पडू शकतो.

जुन्या परंपरांचे उदात्तीकरण करू पाहणाऱ्यांना जुन्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करून तीच गुरुकुल पद्धत पुन्हा आणायची असल्यानेच समाज आणि प्रसार माध्यमेही त्यांच्याकडे वक्रदृष्टीने पाहतो.

रामायणात पुष्पक विमान होते, तुकाराम महाराज त्यात बसून वैकुंठात गेले, ज्ञानेश्वरांनी रेडय़ाकडून वेद म्हणवून घेतले, एवढेच नव्हे तर जनुकीय अभियांत्रिकी, क्लोनिंग, प्लास्टिक सर्जरीसारखे शोधही ऋषीमुनींच कसे लावले या आणि अशा कितीतरी बालसुलभ कल्पनांनी विवेकी माणूस कपाळाला हात लावल्याशिवाय राहणार नाही. मात्र या कल्पना आणणे म्हणजेच जुन्या परंपरांचे पुनरुज्जीवीकरण करून शिक्षणाचे भगवीकरण होय. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संज्ञाही या भगवीकरणाच्या व्याख्येत बसतात.

याचा विचार करून मुख्य सभागृहाचे ‘वेदिका’ असे नामकरण केले आहे. वेद जाणते ती ‘वेदिका’ किंवा यज्ञ जेथे होतो त्या ठिकाणची बळी देण्याची जागा म्हणजे ‘वेदिका’ असे जाणकार सांगतात.

आता या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोणाचा बळी देणार कोणास ठावूक! ‘यज्ञकुंड’ रिमोटने प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, म्हणजे काय? ‘यज्ञकुंड’ कशाला म्हटले आहे, हे कळायला मार्ग नाही. परिसंवादास ‘ज्ञानयज्ञ’ म्हटले असून शोधनिबंध सादरीकरणास ‘समिधा’ म्हटले आहे. तर बीजभाषणास ‘आहुती’ असे नामाभिमान करण्यात आले आहे. शोधनिबंध सादर करण्यास ‘समिधा’ म्हणजे यज्ञासाठी लागणाऱ्या ‘काटक्या’ कोणत्या? आहुती देताना तूप, समिधा टाकून जे यज्ञात बळी दिले जाते ते. त्यामागे अग्नी त्या आहुतींचे ग्रहण करून म्हणजेच भस्म करून ते देवाला देतो, अशी भावना आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञवेदीत प्राणांची ‘आहुती’ दिली, असे आजवर सांगितले जात होते. त्यांच्या प्राणांची आहुती एकीकडे आणि परिषदेतील बीजभाषणासाठी उपयोगात आणणलेला समानार्थी शब्द ‘आहुती’ याचा अर्थच लागत नाही. उपरोक्त ऐतिहासिक संज्ञांचे अशाप्रकारे करण्यात आलेले सार्वत्रिकीकरण हाच मुळात आक्षेपार्ह मुद्दा आहे.

संशोधनातून मूळ भारतीयत्व पुढे आणण्याचा व भारत जगत्गुरू कसा होता वा कसा होऊ शकतो हे सिद्ध करावे लागणार आहे. कारण मधल्या कालखंडात संशोधनाला योग्य दिशा देण्यासाठी कुठेतरी कमी पडलो. हा मधला काळ कोणता हेही स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मात्र, हा मधला काळ कोणता हे सांगायला मंडळ विसरले आहे. या संदर्भात परिषदेचे संयोजक सचिव डॉ. अरविंद जोशी आणि मुकुलजी म्हणाले, ही पुराणातील वांगी नाहीत तर आपल्या ऋषीमुनींनी लावलेले शोध आहेत. शुन्यापासून सर्वच आपण शोधले आहे. मॅट्रिक्स सोडले तर बीजगणित कॅल्कुलस, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह सारख्या कितीतरी संज्ञा आपल्या ऋषीमुनींनी शोधल्या आहेत.

आम्ही ‘कोर्स कन्टेन्ट’ काय असावे याविषयी बोलत नाहीत तर अंतिम सत्याचा शोध म्हणजे ज्ञान होय. एखाद्या ध्येयासाठी जो अस्वस्थ असतो शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून सत्य शोधून काढतो, असे संशोधन अपेक्षित आहे.