दिवसभर विद्यार्थ्यांची धावाधाव

कौशल्य विकसित करून कुशल होण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या युवकांना प्रवेशाकरिता अर्ज करण्याच्या पहिल्याच टप्प्यावर अडथळ्याला सामोर जावे लागत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या दुसऱ्या दिवशी संकेतस्थळ ‘हँग’ झाल्याने इच्छुक उमेदवार आज दिवसभर विविध ‘नॅट कॅफे’त चकरा मारत होते.

औद्योगिक प्रशिक्षण देऊन तरुणांना कुशल करण्यात येते. त्यासाठी चौदा ते ४० वर्षे वयोगटातील युवकांना प्रवेश दिले जाते. यासाठी सोमवारपासून ऑनलाइन अर्ज मागण्यात येत आहेत. व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालयाने दिलेले संकेतस्थळाचे ‘सव्‍‌र्हर’ काम करत नसल्याने अर्ज भरण्यासाठी आज दिवसभर युवक वेगवेगळ्या इंटरनेट कॅफेमध्ये हेलपाटे घालत होते.

तांत्रिक शिक्षणाचे प्राथमिक धडे घेण्यासाठी सज्ज झालेल्या युवकांना प्रवेशाकरिता अर्ज करतानाच तंत्रज्ञानाचा योग्य वापर होत नसल्याचा फटका बसला आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धतीमुळे विद्यार्थी, पालकांना प्रवेश अर्जासाठी रांगेत उभे राहण्यापासून सुटका मिळाली आहे. परंतु तंत्रज्ञानाचा वापर योग्य आणि वेळेची बचत करण्यासाठी यंत्रणा सुसज्ज नसल्याने ते देखील गैरसोयीचे ठरते, याचा अनुभव आज आयटीआयसाठी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत असल्याने युवक आणि त्यांच्या पालकांना आला.  महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २०१७-१८ या सत्रासाठी आयटीआय प्रवेशाकरिता १९ जून ते २ जुलै २०१७ दरम्यान ऑनलाईन अर्ज मागवले आहे. हे सत्र ऑगस्टपासून सुरू होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची पायपीट

आयटीआय प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी दिवसभर वेगवेगळ्या ‘इंटरनेट कॅफे’चे उंबरठे झिजवणारा योगेश भरडकर म्हणाला, मी आज सकाळी ११ वाजता सक्करदरा, ओमनगरमधील एका इंटरनेटमध्ये गेलो. तेथील ऑपरेटरने ‘डीव्हीइटी’चे प्रवेशाकरिताचे संकेतस्थळ उघडण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु ते उघडले नाही. त्यामुळे त्यांनी मला दुपारी ३ वाजता येण्यास सांगितले. त्यावेळेवर मी तेथे पोहोचलो तर संकेतस्थळ ‘हँग’ झाले होते. या ‘इंटरनेट कॅफे’ची अडचण असेलतर म्हणून त्या भागातील दुसऱ्या ‘कॅफे’त गेलो. तेथे देखील संकेतस्थळ काम करीत नव्हते. त्यानंतर रघुजीनगर परिसरातील एका कॅफेत प्रयत्न करून बघितले. आणखी काही ‘कॅफे’त प्रयत्न केला. परंतु सर्वत्र सव्‍‌र्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अख्खा दिवस फिरलो. परंतु अर्ज काही भरणे झाले नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या माझ्या मित्रांचा देखील असाच अनुभव होता, असेही तो म्हणाला.