कौस्तुभ चॅटर्जी यांचे मत

शहराच्या पर्यावरणाला सर्वात मोठा धोका सांडपाणी आणि कचऱ्यापासून आहे. जोपर्यंत या दोन्ही गोष्टींवर महापालिका प्रशासन नियंत्रण मिळवणार नाही आणि नागरिकांचे सहकार्य मिळणार नाही, तोपर्यंत शहराला पर्यावरणाचा धोका कायम आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विकेंद्रित हवा. ही बाब या शहराला साध्य करता आली तर शहराच्या पर्यावरणाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे मत ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांनी व्यक्त केले.

चॅटर्जी यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या भेटीत शहरातील पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या विविध अंगांची उकल केली. केवळ पर्यावरण प्रदूषित करणारे घटकच त्यांनी सांगितले नाहीत, तर त्यावरील उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या. शहरातील नवीन घरबांधणी आराखडय़ात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आवश्यक करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही चॅटर्जी यांनी आणखी काही चांगले उपाय सुचवले. स्नानगृह, शौचालय आणि स्वयंपाकगृह या तीन ठिकाणांहून सांडपाणी निर्माण होते. त्यातील स्नानगृह आणि स्वयंपाकगृहाचे पाणी प्रक्रिया करून वापरात आणले जाऊ शकते. एका व्यक्तीला साधारपणे दिवसातून २५ लीटर पाणी लागते आणि स्नानगृहाचे पाणी प्रक्रिया करून वरच्या टाकीत सोडले तर तेच पाणी शौचालयासाठीसुद्धा वापरले जाऊ शकते. पाण्याची बचत आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण या दोन गोष्टी यामुळे साध्य होऊ शकतात.

हवेचे प्रदूषण, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, माती प्रदूषण आणि सांडपाणी प्रदूषण यातून शहराच्या प्रदूषणाचा स्तर निश्चित होतो. शहरात सध्या ११०० मेट्रिक टन सांडपाणी दररोज निर्माण होते आणि हेच सांडपाणी नरागपूर शहरासाठी आव्हान आहे. शहरातील सर्व पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. प्रत्येक तलावाजवळ असलेली वसाहत त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. कारण या वसाहतीतील सर्व सांडपाणी नदीतलावात सोडले जाते. नागनदीचा प्रश्न आज मोठा आहे आणि ही नागनदी या सांडपाण्याच्या भरवशावरच जीवंत आहे. नागपूर महापालिकेने अलीकडेच यात ९० सांडपाण्याचे स्त्रोत शोधून काढले, पण स्त्रोत शोधून आणि त्याठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून होणार नाही. कारण हे स्त्रोत थांबवले तर नागनदीही मृत पावले. त्यासाठी या प्रकल्पाचे विकेंद्रीकरण आवश्यक आहे. विकेंद्रीकरणानंतर मिळणाऱ्या ५० टक्के पाण्याचा वापर इतर कामांसाठी आणि उर्वरित ५० टक्के पाणी नदीत सोडले जाईल, असे चॅटर्जी म्हणाले.

कधीकाळी हिरव्यागार शहराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले नागपूर आता विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या शहराची हिरवळही कमी होत चालली आहे. मात्र, ही हिरवळ टिकवणे हे आपल्या हातात आहे. प्रत्येक झाड कापल्यानंतर लावण्यात येणारी पाच झाडे ही त्याच परिसरात लावली, तर शहरही विकसित होईल आणि शहराची हिरवळदेखील कायम राहील. झाडे किती आहेत हे महत्त्वाचे नसून ही हिरवळ किती पसरली आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. नागपूर शहरातली हिरवळ पसरलेली नसून, शहराच्या काही भागात हिरवळ तर काही भाग पूर्णपणे कोरडा आहे.

शहराची हिरवळ कायम राखण्याची पंचसूत्री

  • झाड तोडल्यानंतर एक किलोमीटर परिसरातच पाच झाडे लावली पाहिजे.
  • वृक्षारोपण हे तांत्रिक पद्धतीनेच व्हायला हवे.
  • वृक्षतोडीसाठी करण्यात येणारा दंड अधिक हवा.
  • महापालिकेचा उद्यान विभाग सशक्त हवा.
  • महापालिकेत पर्यावरण कक्ष हवा.