जखमी वन्यप्राण्यांची उपचारासाठी भटकंती कायम
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आणि उद्घाटनाचा मुहूर्त लवकरच लागेल, अशी नांदी वनविकास महामंडळाने दिली. मात्र, या ‘रेस्क्यू सेंटर’पेक्षाही अत्याधुनिक अशा सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ तयार असताना मुख्यमंत्र्यांना मात्र उद्घाटनाचा मुहूर्तच सापडत नाही. त्यामुळे जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी अजूनही भटकंतीची वेळ कायम आहे.
सेमिनरी हिल्सवरील रोपवाटिकेत वर्षांनुवर्षांपासून जखमी वन्यप्राण्यांवर कापडांच्या भिंती उभारून उघडय़ावर उपचार करण्यात येत होते. वाघ आणि बिबटय़ांवरदेखील असेच उपचार झालेत. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘रेस्क्यू सेंटर’ वेगळे करण्यात आल्यानंतर जखमी वन्यप्राण्यांची परवड थांबेल, असे वाटले होते. मात्र, प्राणीसंग्रहालयाचे ग्रहण त्यालाही लागले आणि ‘रेस्क्यू सेंटर’च्या वाटचाल मंदावली. दरम्यान तीन वर्षांपूर्वी सेमिनरी हिल्सवर मोकळया झालेल्या मृगविहारावर ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’चा प्रस्ताव वनखात्याने मंजूर केला. बचाव केंद्रात फक्त उपचार होतात, पण या केंद्रात उपचारानंतर वन्यप्राण्याला तात्काळ त्याच्या मूळ अधिवासात सोडण्याची व्यवस्था होती. अतिशय अत्याधुनिक अशा या केंद्राला वनखात्याने तात्काळ मंजुरी दिली आणि त्यासाठी लागणारा निधीही सुपूर्द केला. गोरेवाडय़ातील ‘रेस्क्यू सेंटर’च्या मागाहून या केंद्राची संकल्पना तयार झाली, पण ‘रेस्क्यू सेंटर’च्या आधी ते तयार झाले. अशा प्रकारची संकल्पना असलेले हे भारतातील पहिले केंद्र आहे. उपचारासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक साहित्यासह, सर्वप्रकारच्या प्राण्यांसाठी पिंजरे आणि एवढेच नव्हे तर जखमी वन्यप्राण्यांच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक रचना असलेले टाटा कंपनीचे वाहनसुद्धा येऊन तयार आहे. हे केंद्र तब्बल सहा महिन्यांपासून तयार होऊन असताना मात्र, त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त सापडायला तयार नाही. आता गोरेवाडय़ातील ‘रेस्क्यू सेंटर’ तयार असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच्या उद्घाटनाची नांदी देण्यात आली.
एक अत्याधुनिक आणि भारतातील पहिले केंद्र तर दुसरे नियमित केंद्र, पण त्याची उपयोगिता लक्षात न घेता उद्घाटनाच्या दिल्या जाणाऱ्या प्राधान्यावरून वन्यप्राण्यांवरील उपचार अधांतरी राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.