• मूर्ती विसर्जनाबाबत पर्यावरणवाद्यांची भूमिका
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

मूर्ती विसर्जन तलावात न करणे, निर्माल्य वेगळे काढून ठेवणे, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करणे याविषयी जनजागृती करण्याची वेळ आता संपली आहे. याविषयीचे बोधामृत ७० टक्के नागरिकांच्या पचनी पडले. उर्वरितांना ते पचणारही नाही. तलावांचे प्रदूषण रोखायचे असेल तर कायमस्वरूपी पर्याय आणि कायद्याच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.

गणरायाच्या विसर्जनानंतर प्रदूषित झालेल्या तलावांच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ला दिलेल्या भेटीत निसर्ग विज्ञान संस्थेचे डॉ. विजय घुगे, वृक्ष संवर्धन समितीचे ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे आणि ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चटर्जी यांनी पीओपी मूर्ती, कृत्रिम तलाव, निर्माल्य, तलावांचे प्रदूषण त्यावरील कायमस्वरूपी उपाय आणि कायदा अशा नानाविध पैलूंवर चर्चा केली. पीओपी मूर्ती वापरू नका, असे सांगण्याची वेळ आता संपली. कारण जोपर्यंत या मूर्तीवर कायद्याने बंदी येत नाही, तोपर्यंत त्या बाजारात येतच राहणार आणि भाविकांना ओळखता येत नसल्याने ते खरेदी करतच राहणार. तलाव प्रदूषणासाठी या मूर्ती मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहेत. मागील वर्षी सोनेगाव तलाव आणि यावर्षी गांधीसागर व सक्करदरा तलाव मूर्ती विसर्जनाकरिता बंद करून महानगरपालिकेने योग्य पाऊल उचलले. परिणामी, घरगुती मूर्ती विसर्जनाची कृत्रिम तलावातील संख्या वाढली, पण मंडळांच्या मोठय़ा मूर्तीचा संपूर्ण भार फुटाळा आणि त्यापाठोपाठ नाईक तलावावर आला. जलकुंभीने व्यापलेला फुटाळा तलाव मूर्ती विसर्जनामुळे मागील वर्षीपेक्षाही दुपटीने प्रदूषित झाला. मुळात समस्या मंडळांच्या मोठय़ा मूर्तीची असून त्यांना समजावणे कठीण आहे. कोल्हापूरने याबाबत चांगला आदर्श घालून दिला. त्याठिकाणी मूर्ती विसर्जनाच्या दिवशी शहरभर मिरवणूक काढतात आणि मूर्ती विसर्जित न करता दान केली जाते. नागपूर शहराने कोल्हापूरचा आदर्श घ्यायला हवा. अर्थातच, त्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता महत्त्वाची आहे. दुर्दैव म्हणजे, शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळांवर राजकीय वरदहस्त आहे. त्यामुळे जोपर्यंत ही राजकीय इच्छाशक्ती जागृत होत नाही, तोपर्यंत काहीच घडून येणार नाही, यावर तिन्ही पर्यावरणवाद्यांनी एकमत नोंदवले.

मूर्तीच्या उंचीवर र्निबध हवे

प्रदूषणाबाबत काही वर्षांपासून जागृती केली जात असली तरी पाच वर्षांनंतरही आश्वासक चित्र दिसून येत नाही. यंदा लोकांची मने वळवण्यात महानगरपालिका बरीच यशस्वी ठरली, पण मंडळांच्या कार्यकर्त्यांची मने वळवणे कठीण आहे. मंडळांच्या गणेश मूर्तीची उंची पाच फुटापेक्षा अधिक नको. तसे असेल तर त्यानंतरच्या प्रत्येक फुटावर पाच हजार रुपयाचा दंड ठोकायला हवा. मंडळांनी एवढे पाऊल उचलले तरी तलावांचे प्रदूषण रोखता येईल.

कौस्तुभ चटर्जी, ग्रीन विजिल फाऊंडेशन

तलावत विसर्जन थांबले नाही

निर्माल्य वेगळे काढून ठेवणे आणि कृत्रिम तलावात विसर्जन करणे याबाबत नागरिक आता जागरूक होऊ लागले असले तरीही तलावातील मूर्ती विसर्जन थांबले नसल्याने पाणी प्रदूषित होतच आहे. अंबाझरीत वाहत्या पाण्यासाठी बांध घातले आहेत. असेच बांध सर्वत्र हवे. विशेषकरून नागनदीवर असे बंधारे घातल्यास त्याठिकाणी मंडळांच्या मोठय़ा मूर्ती विसर्जनाची प्रक्रिया पार पाडता येईल.

ऋतुध्वज ऊर्फ बाबा देशपांडे

फुटाळ्यावरही हवी विसर्जन बंदी

मोठय़ा मूर्ती निर्माल्यासह विसर्जित करण्यात आल्याने फुटाळा तलाव पूर्णपणे प्रदूषित झाला. सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर तलावाप्रमाणे फुटाळ्यावरही विसर्जनासाठी बंदी हवी. मोठय़ा मूर्तीचे विसर्जन खाणीमध्ये केले जावे. महानगरपालिकेने यावर्षी चांगले पाऊल उचलले असले तरीही त्यांचा अधिकाधिक भर हा घरगुती मूर्तीवरच केंद्रित होता. मंडळांच्या मोठय़ा मूर्तीबाबत उपाययोजना नव्हती.

डॉ. विजय घुगे, निसर्ग विज्ञान संस्था