२० पेक्षा अधिक जखमी

कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या राज्यातील संगणक शिक्षकांना सेवेत कायम सामावून घ्यावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या संगणक शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांनी पाण्याचा मारा करीत लाठीमार केला असून त्यात २० पेक्षा अधिक शिक्षक जखमी झाले आहे. त्यात अनेक युवतींचा समावेश आहे. या लाठीमाराच्या घटनेने कस्तुरचंद पार्क परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भोवळ येऊन कोसळल्याने लता ढोरे यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य संगणक शिक्षकांचा मोर्चा काढण्यात आला. तो श्री मोहीम कॉम्पलेक्सजवळ अडविण्यात आल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मोर्चासमोर यावे, अशी मागणी करीत मोर्चातील संगणक शिक्षक अडून बसले होते. रात्री उशिरापर्यंत ते आले नाही त्यामुळे रात्रभर दोनशेपेक्षा संगणक शिक्षक थंडीमध्ये मोर्चास्थळी ठाण मांडून बसले होते. संघटनेचे अध्यक्ष जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असताना शिक्षणमंत्र्यांनी मंगळवारी तरी मोर्चासमोर येऊन आमचे म्हणणे ऐकावे अशी मागणी केली. पण विनोद तावडे मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले. तावडे यांच्याशी संघटनेच्या प्रमुखांनी फोनवर संवाद साधला तर विमानतळावर मला भेटायला या असे सांगितले. मात्र मोर्चेकरी शिक्षक तावडेंनी मोर्चासमोर यावे अशी मागणी करीत ठाण मांडून बसले. दुपारी १  वाजतानंतर सर्व संगणक शिक्षक आक्रमक झाले. तावडेच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले आणि कठडे तोडून समोर जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी काही युवक, युवती आक्रमक झाले आणि पोलिसांशी धक्काबुकी सुरू झाली.

दरम्यान, बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले कठडे तोडून फेकून दिले जात असताना पोलिसांनी वरुणद्वारे प्रारंभी पाण्याचा मारा करीत मोर्चेकऱ्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोर्चातील युवक अधिक आक्रमक झाल्यावर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. मिळेल त्या ठिकाणी शिक्षकांना लाठीने मारहाण केली जात होती. मोर्चेकऱ्यांनी त्यानंतर एलआयसी चौकात रस्ता रोको आंदोलन सुरू केल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. या लाठीमारामध्ये २० पेक्षा अधिक संगणक शिक्षक जखमी झाले असून त्यांना पोलीस लाईन टाकळी येथील दवाखान्यात हलविण्यात आले. सर्व मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ असलेले सामान परिसरात अस्तावस्त झाले होते.

मागितली नोकरी, मिळाल्या लाठय़ा

केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत बीओटी तत्त्वावर कंपनीच्यावतीने पाच वर्षांपर्यंत कार्यरत संगणक शिक्षकांना कायम सेवेते सामावून घ्यावे, अशी मागणी या शिक्षकांची होती. अन्य राज्यात शिक्षकांना कायम सेवेत घेण्यात आले असताना महाराष्ट्रात मात्र त्याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. शासनाने अनेकदा केवळ आश्वासन दिली. मात्र, त्याची गेल्या दीड वर्षांत अंमलबजावणी केली नाही. राज्यात ८ हजारच्या जवळपास संगणक शिक्षक असून त्यातील अनेकांना कामावरून काढण्यात आले. मोठय़ा प्रमाणात संगणक शिक्षक रस्त्यावर आले असून बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना कायम सेवेत घ्यावे ,अशी मागणी करायला आलो आणि पोलिसांनी मात्र आमच्यावर लाठीमार केला. – जीवन सुरुडे

रुग्णालयात नेण्यासाठी टाळाटाळ

संगणक शिक्षकांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा आणि लाठीमार केला जात असताना त्याचे छायाचित्र करणाऱ्या छाायाचित्रकारांवर पाण्याचा मारा केल्याने अनेकांचे कॅमेरे खराब झाले. या लाठीमाऱ्यात अनेक संगणक शिक्षक जखमी झाले असताना त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी त्या ठिकाणी रुग्णवाहिका असली तरी पोलिसांच्या गाडीत त्यांना अक्षरश कोंबले जात होते. कोणाच्या डोक्याला मार लागला तर कोणाच्या पायाला मार लागल्यामुळे रक्त वाहत होते. मात्र, जखमींना दवाखान्यात नेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले. या जखमीमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील संगणक शिक्षकांचा समावेश होता.