विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल

मानस बहिणीला अश्लील संदेश पाठवून विनयभंग करणाऱ्या वकिलास उच्च न्यायालयाच्या बाररूममध्ये चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर खंडपीठाच्या बार रूम क्रमांक-१ मध्ये घडली. या घटनेमुळे वकील समुदायात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दिली असून प्रतापनगर पोलिसांनी वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर सदर पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या नवऱ्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नितीन धनंजय खांबोरकर (५०) रा. सृष्टी अपार्टमेंट, व्हीआयपी रोड असे आरोपी वकिलाचे नाव आहे. नितीन खांबोरकर यांच्या परिचयातील एका कंत्राटदार तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांकडून तिच्या प्रेमविवाहाला विरोध होता.

त्यामुळे कंत्राटदार तरुणाने खांबोरकर यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर मुलगा व मुलगी घरातून निघून गेले आणि एप्रिल २०१२ मध्ये गोंदिया येथील आर्य समाज मंदिरात लग्न केला. त्यावेळी खांबोरकर यांनी मुलीचे कन्यादान केले होते. तेव्हापासून पीडित तरुणी नितीन यांना भाऊ म्हणायची. तेही त्याच नात्याने तिला वागवत होते.

गेल्या ९ सप्टेंबरला अठ्ठावीस वर्षीय पीडित तरुणीने नवीन मोबाईल घेतला. या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू केले. त्यामुळे तिने सर्वाना आपला व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक कळविला. त्याच दिवशी पीडित तरुणीचा पती काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेला होता. त्यावेळी रात्रीच्या सुमारास खांबोरकर यांनी तिच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर नियमितपणे ते अश्लील संदेश पाठवू लागले. एकटय़ात भेटण्यासाठी आग्रहीही धरला. गेल्या शनिवारी तिचा नवरा परत आला असता तिने सर्व हकिकत त्याला सांगितली. त्यानंतर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पीडित तरुणी नवऱ्यासह उच्च न्यायालयात जाऊन नितीन खांबोरकर यांच्याशी चर्चा करायला गेली.

त्यावेळी तिथे भांडण झाले आणि पीडित तरुणीचा पती आणि नितीन खांबोरकर यांच्यात हाणामारी झाली, अशी तक्रार पीडित तरुणीने प्रतापनगर पोलिसात दिली आहे. मारहाण करणाऱ्याच्या पत्नीनेच आपल्याला अश्लील संदेश पाठविले.

तसेच तिने स्वत:कडून केलेले अश्लील संदेश खोडून केवळ आपले संदेश दाखविले. त्यानंतर तिच्या नवऱ्याने आपल्याला मारहाण केली आणि धमकी दिल्याची तक्रार सदर पोलिसांत दिली. महिलेच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, तर अ‍ॅड. नितीन खांबोरकर यांच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध मारहाण करणे आणि धमकी देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.