गायीला ठार मारल्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी बिबटय़ावर काठय़ांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्य़ातील कोका अभयारण्यालगत रेंगेपार कोठा गावाच्या सीमेवर ही घटना घडली. गावकऱ्यांचा जमाव नियंत्रित करून बिबटय़ाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर बिबटय़ाने हल्ला केला, यात दोघे जखमी झाले.

रेंगेपार कोठा गावात बुधवारी सकाळच्या सुमारास बिबटय़ाने गायीला मारले. या प्रकारामुळे चिडलेले गावकरी एकत्र आले आणि त्यांनी बिबटय़ाची शोधाशोध सुरू केली. या आरडाओरडीत बिबटय़ा एका रिकाम्या जलवाहिनीत जाऊन बसला. त्यामुळे गावकऱ्यांनी जलवाहिनीच्या एका बाजूने कापडचिंध्या जाळल्याने अर्धमेल्या अवस्थेत बिबट बाहेर पडला. गावकऱ्यांनी त्याला पकडून लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली. दरम्यान, वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या तावडीतून बिबटय़ाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या धरपकडीत बिबटय़ाने दोन वन कर्मचाऱ्यांना जखमी केले. गावकरी आणि इतरही वन कर्मचाऱ्यांनी पुन्हा काठय़ांनी मारणे सुरू केले. यात बिबट जागीच मृत पावला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी उपवनसंरक्षक उमेश उदल वर्मा यांना विचारले असता गाय मृत पावल्याने गावकऱ्यांना नियंत्रित करणे कठीण झाले होते. त्यांनी विशेष व्याघ्र संरक्षण दल तसेच वनरक्षकांनासुद्धा येऊ दिले नाही. त्यामुळे पोलिसांचा ताफा बोलवावा लागला. या झटापटीत दोन वनकर्मचारीही जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

समन्वयाचा अभाव

गावकरी आणि वनखात्यात सुरुवातीपासूनच याठिकाणी समन्वय नाही. त्यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. प्रादेशिक वनविभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. वन्यजीव विभागाकडे विशेष व्याघ्र संरक्षण दल आहे. मात्र, प्रादेशिक आणि वन्यजीव खात्यात समन्वय नसल्याचेही सांगितले जाते. बिबटय़ाला थोडा वेळ दिला असता तर तो निघून गेला असता. तो घरात घुसलेला नव्हता. त्यामुळे योग्य पद्धतीने ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवले असते तर बिबटय़ाचा जीव वाचू शकला असता. अतिशय अमानवी पद्धतीने त्या बिबटय़ाला मारण्यात आल्याने आणि वनखात्याची भूमिकेवर संशय व्यक्त केल्या जात आहे.