पिंजऱ्यात शिरण्यास ‘ली’चा नकार

‘साहेबराव’ पाठोपाठ ‘ली’ची रवानगीसुद्धा दूरदेशी करण्याची त्यांची पूर्ण तयारी झाली होती, पण तिने जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिला घेण्यासाठी आलेल्या ताफ्याला आणि तिच्या पाठवणीचे साक्षीदार होण्यासाठी जमलेल्यांना आल्यापावली परत फिरावे लागले. महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘ली’ या वाघिणीची रवानगी शनिवारी गोरेवाडय़ात होणार होती. त्यासाठी तब्बल चार तासाहून अधिक वेळ खर्ची घातला गेला. मात्र तिने पिंजऱ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. वेळेची मर्यादा ओलांडल्याने गोरेवाडा प्रशासनाला तिला न घेताच परत जावे लागले. त्यामुळे महाराजबाग ते गोरेवाडा असा तिचा प्रवास आता दोन दिवसांवर ढकलला गेला.

तब्बल वर्षभरापूर्वी २५ जुलै २०१६ ला महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘साहेबराव’ या पायाची बोटे गमावलेल्या वाघाची रवानगी गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याच सहकारी वाघिणीच्या स्थलांतरणासाठी गोरेवाडा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी महाराजबाग प्रशासनाला पत्र पाठवले. त्यानुसार शनिवारी या वाघिणीच्या स्थलांतरणासाठी गोरेवाडय़ाची चमू महाराजबागेत आली. महाराजबाग ते गोरेवाडा अशा प्रवासाकरिता वाहतूक परवानाही मिळवण्यात आला. त्यानुसार दुपारी तीन वाजतापासूनच प्रयत्न सुरू झाले. पहिला पिंजरा या वाघिणीच्या वास्तव्य ठिकाणाच्या प्रवेशद्वारावर नीट बसला नाही. त्यामुळे महाराजबागेतील उपचाराचा पिंजरा त्याठिकाणी आणण्यात आला. शेवटी एक पिंजरा या प्रवेशद्वारावर नीट बसला, पण वाघीण या पिंजऱ्यात यायलाच तयार नव्हती. सुमारे चार तास ती पिंजऱ्यात येईल म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. तरीही तिने मूळ वास्तव्याच्या ठिकाणी जे ठाण मांडले, तिथून ती उठलीच नाही. वाहतूक परवान्याची मुदतही सायंकाळी सहा वाजेपर्यंतची असल्याने स्थलांतरणाची ही प्रक्रिया थांबवावी लागली. यावेळी गोरेवाडय़ाचे अधिकारी नंदकिशोर काळे, श्रीनिवास माडभूशी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धूत, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, महाराजबागेचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर आदी उपस्थित होते. रविवारी पुन्हा असेच प्रयत्न करण्यात आले.