भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला हजेरी लावली.  भाजपमधील नाराजांची समजूत काढण्यासाठी पुढच्या काळात अडवाणींच्या माध्यमातून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने त्यांची नागपूर भेट होती, अशी चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे १२ वर्षांनंतर अडवाणी यांनी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमाला आले, असे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून संघ आणि अडवाणी यांच्यात विशेष संवाद नव्हता. पाकिस्तानात जाऊन मोहम्मद अली जिना यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याने संघ त्यांच्यावर नाराज होता. आताच्या भेटीतून ही नाराजीही दूर झाल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी (२९ सप्टेंबर) अडवाणी नागपुरात आले. त्यांचा वर्धमाननगरातील एका उद्योजकांच्या घरी मुक्काम होता. शनिवारी सकाळी साडेसात वाजता ते रेशीमबाग मैदानावरील संघाच्या कार्यक्रमाला हजर झाले. त्यानंतर त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केल्याची माहिती आहे. कार्यक्रमानंतर त्यांना पत्रकारांनी गाठले पण, ते बोलले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर सोशल मीडियावरून टीका होत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह भाजपचे अन्य जुनेजाणते नेते मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर नाराज आहेत.

यामुळे मोदी सरकारची प्रतिमा डागाळत असून संघाने केलेल्या एका सर्वेक्षणात २०१९ मध्ये भाजपला याचा फटका बसणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना मानणारा मोठा वर्ग मोदी-शहांच्या कार्यप्रणालीमुळे नाराज आहे. अडवाणी यांच्या माध्यमातून नाराज गटाला समजावण्यासाठी ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न केला जाईल. अडवाणींची संघ भेट याचाच एक भाग होता, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

भय्याजी जोशींसोबत चर्चा

नागपूर भेटी दरम्यान अडवाणी यांनी संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. कार्यक्रम संपल्यानंतर भय्याजी जोशी यांनी स्वत: व्हीआयपी दालनात जाऊन अडवाणींची भेट घेतली व त्यांच्यासोबत कारने स्मृती मंदिराकडे रवाना झाले. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोशी व अन्य संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुपारी अडवाणी येथूनच दिल्लीला रवाना झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lk advani attended vijaya dashami celebrations at rss headquarters
First published on: 03-10-2017 at 03:57 IST