शहर, ग्रामीणमध्ये दिवसभरात तीन हत्या

शहराचा विकास होत असताना दिवसेंदिवस वाहनतळांची समस्या बिकट होत चालली आहे. वाहनतळासाठी आता लोक एकमेकांच्या जीवावर उठले असून शहरातील गोळीबार चौक परिसरात वाहन उभे करण्यावरून दोन गटातील वादातून एकाचा खून करण्यात आला. दरम्यान, सोमवारी शहर व ग्रामीण भागात एकूण तीन खुनाच्या घटना घडल्या असून यात दोन महिलांचा समावेश आहे.

आशीष केशवराव कांबळे (३७) रा. खामला असे मृताचे नाव आहे. आशीष हे टेलिग्राफ प्रा. लि. कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. रविवारी नागपुरात आयोजित परिषदेकरिता ऋतुराज नंदकिशोर भादवीकर (३२) रा. जेल रोड, नाशिक हे नागपुरात आले होते. परिषद संपल्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास आशीष आणि ऋतुराज हे आपल्या एमएच-४०, ए-९२६१ क्रमांकाच्या महिंद्रा झायलो कारने गोळीबार चौकातील ओम शक्ती सावजी भोजनालयात जेवण करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी एका दुसऱ्या हॉटेलमध्ये कार उभी केली होती. जेवण झाल्यानंतर ११.१५ वाजताच्या सुमारास ते गाडीजवळ आले. त्यावेळी त्यांच्या गाडीजवळ अतुल सुदाराम सदावर्ते (३१) रा. गोळीबार चौक आणि स्वप्निल शरदराव महाजन (३१) रा. इतवारी हे उभे होते. आशीष यांच्या गाडीमुळे त्यांची गाडी निघू शकली नाही आणि ते अडकून पडले होते, या कारणावरून त्यांनी आशीषशी भांडण केले. वाद विकोपाला गेला आणि अतुल व स्वप्निल यांनी आशीषला मारहाण केली. त्यात आशीष गंभीर जखमी झाला. ऋतुराज यांनी आशीषला रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदी परिसरात घडली. कन्हान नदीच्या पूल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेचे वय ३० ते ३५ या दरम्यान असून तिचा चार ते पाच दिवसांपूर्वी खून करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. तिच्या डोक्यावर दगडाने व चाकूने वार करण्यात आले आहे. मारेकरी आणि महिला एकमेकांच्या परिचयातील असावेत आणि त्याने विश्वासाने महिलेला भेटायला बोलाविले असावे. ते नदीच्या परिसरात बराच वेळ बसले होते. त्यानंतर महिलेचा खून करण्यात आला, असे प्रथमदर्शनी दिसते आहे. महिलेची ओळख पटली नाही. अरुण बारसू वंजारी (५०) रा. नेरी यांच्या नजरेस ही बाब आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.डी. मांडवकर हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

तिसरी घटना नागपूर ग्रामीण परिसरातील उमरेड येथे घडली. ज्योती बबन मोहिनकर (३२) रा. तारणा, गोंड मोहल्ला कुही ही सोमवारी सकाळी ७ वाजता पती बबन बापुराव मोहिनकर (३६) याच्यासह गावाशेजारच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. जंगलाच्या आतमध्ये बबनने ज्योतीवर कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. चारित्र्याच्या संशयातून त्याने तिचा खून केला असावा, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

पार्किंग नसलेल्या इमारतींवर होणार का कारवाई?

शहरात टोलेजंग इमारती निर्माण करण्यात आल्या. एकेका इमारतींमध्ये अनेक दुकाने आणि निवासी सदनिका आहेत. मात्र, इमारतींमध्ये वाहनांसाठी जागा नाही. त्यामुळे लोकांना रस्त्यांवर वाहने उभी करावी लागतात. ज्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा आहे, त्या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केले आहे किंवा ग्राहकांना तेथे वाहने उभी करू दिली जात नाही. धंतोली परिसरात वाहनतळाची समस्या असून तेथील प्रश्न उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आल्याने आता तेथील वाहतूक व वाहनतळ व्यवस्थेला एक शिस्त लागली आहे. परंतु शहरातील इतरही भागांमध्ये कमीअधिक प्रमाणात हीच समस्या भेडसावत आहे. पोलिसांनी इतरही भागातील वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.