मालती करंडकपासून ते पुरुषोत्तम करंडकपर्यंत अनेक स्पर्धा गेल्या काही वर्षांमध्ये नागपुरात सुरू आहेत, पण लोकांकिका जबरदस्त आहे. कारण, तिच्यामुळे काठीण्य पातळी वाढली आहे. प्रथम फेरीनंतर, द्वितीय फेरीतून नागपुरातून फक्त एकाच एकांकिकेची निवड होणार असल्याने मेहनतीशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्रिया ‘भारत अभी बाकी है’ या धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेतील सहभागींनी व्यक्त केल्या.

लोकांकिकेची विभागीय प्राथमिक फेरी तीन व चार डिसेंबरला झाली. त्यात रेनायसन्स महाविद्यालयाची ‘मलबा’, महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालयाची ‘कस्र्ड किंग’, डॉ. विठ्ठलराव खोबरागडे महाविद्यालयाची ‘उपोषण’, चंद्रपूरच्या यादवराव पोरशेट्टीवार कला महाविद्यालयाची ‘लायसन्स’ आणि धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘भारत अभी बाकी है’ या पाच एकांकिकांची निवड करण्यात आली. ‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या तालमींनी वेग घेतला आहे.

इतर एकांकिकांच्या तुलनेत कामगिरी सरस करण्याचा आणि परीक्षकांनी दिलेल्या सूचनांचा मान राखत सुधारित एकांकिका विभागीय अंतिम फेरीत सादर करण्याचा प्रयत्न त्या पाच महाविद्यालयांनी सुरू केला आहे.

धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘भारत अभी बाकी है’ ला परीक्षकांची पसंती मिळाली. यंदाच्या इन्स्टिटय़ुशनल अत्याचाराला बळी पडलेल्या ‘रोहित वेमुला आत्महत्या’ प्रकरणावर आधारित एकांकिकेने पहिल्या पाचांमध्ये स्थान मिळवल्याने आमची जबाबदारी वाढली आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह’ अकॅडमी व ‘झी युवा’ यांचे सहकार्य स्पर्धेला लाभले आहे. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर ‘आयरिश प्रॉडक्शन’ असून गेली तीन वर्षे ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवरील तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या पारितषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत.

आमची स्पर्धा आमच्याशीच

‘भारत अभी बाकी है’ मध्ये पत्रकाराच्या भूमिकेत होते. अभ्यासाव्यतिरिक्त वेगळे व्यासपीठ आणि करिअरचे वेगळे क्षेत्र ‘लोकांकिके’मुळे निवडण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘स्टेज डेअरिंग’, आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. स्पर्धेत कोणीतरी जिंकणारच! आम्ही आमच्या परीने ‘बेस्ट’ देण्याचा प्रयत्न तर करूच. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. एकांकिकेतून उपस्थितांवर काय छाप सोडून जातोय, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

– लक्ष्मी बोरकर

लोकांकिका जबरदस्त!

नाटकाचा दिग्दर्शक म्हणून एक चांगला अनुभव गाठीशी आहे. दुसऱ्या फेरीत एकांकिका दाखल झाल्याने जबाबदारी वाढली आहे. स्पर्धेची काठीण्य पातळी वाढली आहे. नागपुरात अनेक स्पर्धा होतात. अगदी मालती करंडकपासून ते पुरुषोत्तम करंडकपर्यंत पण, लोकांकिका जबरदस्त आहे.

– अमीत गणवीर

प्राथमिक फेरीचा उत्तम अनुभव

लोकांकिकेच्या प्राथमिक फेरीचा उत्तम अनुभव. नागपूरबाहेरचे परीक्षक असल्याने नाटक मनमोकळेपणाने सादर केले. नागपुरात व्यावसायिक नाटकांची फारशी निर्मिती होत नाही. लोकांकिकेमुळे नागपूरबाहेरची रंगभूमी, तांत्रिकी माहिती किंवा मार्गदर्शन मिळण्याची संधी आहे. प्राथमिक फेरीतील एकांकिकेतील उणिवा भरून काढून ते आणखी उत्कृष्ट करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कलाकृती सादर करताना वेळेचे बंधन असते. तेव्हा सेट लावण्यात कलाकाराचा कमीतकमी वेळ जाईल, असा आमचा प्रयत्न राहील.

– कनक अंबादे

महाविद्यालयात पोषक सांस्कृतिक वातावरण

धनवटे नॅशनल महाविद्यालयाची दरवर्षी एक सांस्कृतिक समिती आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्राध्यापकांकडे तिची जबाबदारी सोपवली जाते. महाविद्यालयाचे सत्र सुरू झाले की, विद्यार्थ्यांमधून नोटीस फिरवली जाते. त्यात ज्या ज्या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांना आवड असते, त्यांच्या नावांची नोंद केली जाते आणि वेगवेगळ्या स्पर्धासाठी त्यांना पाठवले जाते. महाविद्यालयात मुलांना पोषक सांस्कृतिक वातावरण असून लोकांकिकेत मुलांनी मिळवलेले यश आमच्यासाठी निश्चितच गौरवास्पद असून कलावंतांचा आम्ही सत्कार करणार आहोत. तसेच ९ डिसेंबरला सायंटिफिक सभागृहात होणाऱ्या दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणार आहोत.

– डॉ. ज्ञानेश्वर खडसे, संयोजक, सांस्कृतिक समिती संयोजक, धनवटे नॅशनल महाविद्यालय