लोकसत्ता लोकांकिकाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दोन दिवसीय प्राथमिक फेरीतील ‘मलबा’, ‘लायसन्स’, ‘कस्र्ड किंग’, ‘भारत अभी बाकी है’ आणि ‘उपोषण’ या पाच एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

विनोबा विचार केंद्राच्या सभागृहात झालेल्या या एकांकिका स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अनेक गंभीर सामाजिक विषयांना हात घातला. नागपुरातील प्रगल्भ सांस्कृतिक वातावरणाची झलक दोन दिवसांच्या नागपूर विभागीय स्तरावरील प्राथमिक फेरीत दिसून आली. परीक्षा, प्रवासाची अपुरी साधने, तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावातही महाविद्यालयांनी तब्बल २० एकांकिका सादर केल्या. काहींचा पहिलाच प्रयत्न, तर काहींच्या गाठी गेल्या वर्षीच्या लोकांकिकेचा अनुभव होता. आज ९ एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यात अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयाची ‘चित्रविचित्र’, डॉ. विठ्ठलराव खोबरागडे कला व वाणिज्य महाविद्यालयाची ‘उपोषण’, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची ‘जीव-एन’, ज्योतिराव फुले महाविद्यालयाची ‘फर्टिलायझर’, अकोल्याच्या शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची ‘नवे गावकुस’, गोंडवाना विद्यापीठाची ‘पुरोगामी म्हणजे  काय?’, व्हीएमव्ही महाविद्यालयाची ‘ए फॉर अ‍ॅक्टिंग’, कुरखेडय़ाच्या गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाची ‘जय हो’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘आम्ही कोण?’ यांचा समावेश होता. दोन दिवसांच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून विजय निकम आणि गिरीश पतके यांनी काम पाहिले. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह’ अकॅडमी व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता’ लोकांकिकांची ही प्राथमिक फेरी शनिवार आणि रविवारी विनोबा विचार केंद्रात पार पडली. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असणाऱ्या ‘आयरिस प्रॉडक्शन’चे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. गेली तीन वर्षे ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने आठ केंद्रांवरील तीन फेऱ्यांमध्ये होणाऱ्या स्पर्धेच्या पारितोषिकांपोटी यंदा साडेतीन लाख रुपयांची बक्षिसे घोषित करण्यात आली आहेत.

विभागीय अंतिम फेरीत दाखल झालेल्या एकांकिका

  • रेनायसन्स कॉलेज, नागपूर- ‘मलबा’
  • महालक्ष्मी जगदंबा महाविद्यालय, नागपूर- ‘कस्र्ड किंग’
  • डॉ. विठ्ठलराव खोबरागडे महाविद्यालय, नागपूर – ‘उपोषण’
  • यादवराव पोरशेट्टीवार कला महाविद्यालय, चंद्रपूर – ‘लायसन्स’
  • धनवटे नॅशनल महाविद्यालय, नागपूर – ‘भारत अभी बाकी है’

विभागीय अंतिम फेरी ९ डिसेंबरला

  • राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी येत्या ९ डिसेंबरला नागपूरच्या आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.