पोलिसांकडून अटक

सहा देशीकट्टय़ांसह मध्यप्रदेशातील एका तरुणाला नागपुरात फिरताना अटक करण्यात आली. यात ४ पिस्तूल, एक देशीकट्टा व १ एअरगनचा समावेश आहे. इमाम खान अब्दुल रहिम (२९) रा. छिंदवाडा असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो बेसा प्ररिसरातील ग्रीनसिटी, एमरॉन विंग-३, फ्लॅट क्रमांक-००१ येथे भाडय़ाने राहात होता.

आरोपी हा सोमवारी संशयास्पदरित्या फिरताना दिसला. त्यावेळी गुन्हे शाखा पोलिसांनी संशयाच्या आधारावर त्याला हुडकेश्वर परिसरातील व्यंकटेश सिटी परिसरात ताब्यात घेतले व चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पोलिसांनी त्याच्याकडील बॅग तपासली असता त्यात देशी बनावटीच्या ४ पिस्तूल, १ देशीकट्टा, १ एअरगन, पिस्तुलाची मॅगझिन आणि ५ जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हे शस्त्र मध्यप्रदेशातून नागपुरात विक्रीसाठी आणले होते, असे समजते. मात्र, ते शस्त्र कुणाच्या मागणीवरून त्याने आणले होते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी चंद्रपूर पोलीस ठाण्यात दारू तस्करीचा गुन्हा दाखल आहे. त्यावेळी त्याच्याकडून एक स्वीफ्ट कारही जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर, सहाय्यक निरीक्षक प्रदीप अतुलकर, किरण चौगले, प्रशांत चौगुले, उपनिरीक्षक मनीष वाकोडे, सूरजपालसिंग राजपूत, हवालदार राजू डांगे, सुखेदव मडावी, मिलिंद मून, नृसिंह दमाहे, सुधाकर धंदर, संजय देवकर, रवींद्र राऊत, रामकैलाश यादव, सतीश निमजे, प्रशांत कोडापे, अविनाश ठाकूर, राजेंद्र तिवारी यांनी केली, अशी माहिती सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त सोमनाथ वाघचौरे उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याला शस्त्राचा पुरवठा करणाऱ्यांच्या शोधात एक चमू मध्यप्रदेशला रवाना झाली आहे.