शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासण्यास विरोध; उत्तरपत्रिकांचे गठ्ठे मुख्याध्यापकांच्या कक्षात
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे गेल्या तीन दिवसांपासून मुख्याध्यापकांच्या कक्षात पडून आहेत. मंडळाने उत्तरपत्रिका तपासणीसाठी पर्यायी व्यवस्था न केल्याने बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महासंघ आणि विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे असहकार आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांचा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर घातलेला बहिष्कार कायम असून बारावीचे पेपर तपासणीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून २२ फेब्रुवारीपासून उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे तीन पेपर झाले असून ते मंडळाने विविध जिल्ह्य़ातील मुख्याध्यापकांकडे सुपूर्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून संबंधित शिक्षकांना दिले जात असताना कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी मात्र ते पेपर अजूनही तपासणीसाठी घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.
५ जूनपूर्वी बारावीचा निकाल लावणे अपेक्षित असताना या सर्व घडामोडीमुळे आता बारावीचा निकाल दरवेळेस पेक्षा उशिरा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्यावर्षी शिक्षकांनी आंदोलन केले असताना शिक्षण मंडळाने पर्यायी व्यवस्था म्हणून सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मंडळाला सेवानिवृत्त शिक्षकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.
शिक्षकांच्या मागण्यासंदर्भात सरकारने अजूनही आपली भूमिका निश्चित केली नाही. त्यामुळे शिक्षकांचे अहसकार आंदोलन सुरू असून त्यांनी जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात संघटनेचे महासचिव अशोक गव्हाणकर म्हणाले, गेल्या आठ महिन्यापासून सरकारकडे आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन दिले असताना सरकार मात्र काहीच दखल घेत नाही. विद्यार्थ्यांंना वेठीस धरण्यासाठी आमचे असहकार आंदोलन नाही. बहिष्कार टाकायचा असता तर बारावीच्या परीक्षेवर टाकला असता. मात्र, संघटनेची अहसकार आंदोलन करण्याची भूमिका आहे आणि ती आजही कायम आहे. गेल्यावर्षी १३ लाख ८४ हजार उत्तरपत्रिका तपासण्याचे काम होते. यावर्षी कमी जास्त प्रमाणात असतील. मुख्याध्यापकांकडून उत्तरपत्रिका स्वीकारल्या जातील तरी रोज २५ उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी असताना आम्ही मात्र १ किंवा २ उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय घेणार असल्याचे गव्हाणकर यांनी सांगितले.

या संदर्भात शिक्षण मंडळाचे सचिव सेवाकर दुपारे म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यासाठी आंदोलन न करता त्यांनी उत्तरपत्रिकांचे काम हाती घ्यावे. शिक्षण मंडळाने अजूनही कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नसून राज्य मंडळाकडून तसे आदेश आल्यास विचार करण्यात येईल. शिक्षकांनी दरवर्षीच केवळ परीक्षेच्या दिवसात असहकार आंदोलन करणे योग्य नाही. सरकारचे आणि न्यायालयाचे आदेश असताना शिक्षकांना पेपर तपासणीचे काम हाती घ्यावे लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे दुपारे म्हणाले. शिक्षकांना बैठकीसाठी आमंत्रित केले जात असताना ते उपस्थित राहत नाही. आंदोलन करून प्रश्न सुटण्यापेक्षा चर्चेतून त्या सोडविल्या तर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, असेही दुपारे म्हणाले.