नागपुरातही सीसीटीव्ही डीपीआर -मुख्यमंत्री
मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही सीसीटीव्ही बसवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत असून हा अहवाल प्राप्त झाल्यावर एका वर्षांत संपूर्ण शहर कॅमेऱ्याच्या नजरेखाली येणार आहे. मुंबईतील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून उद्या, सोमवारी त्याचे लोकार्पण करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या ‘डिसीआरएमएस-डायल १००’ या यंत्रणेचे उद्घाटन आणि गस्ती वाहनांचा शुभारंभ रविवारी केला. याप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर २००८ मध्ये संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्याची योजना आखण्यात आली, परंतु त्यावर निर्णय होत नव्हता. आमचे सरकार आल्यानंतर चार महिन्यात निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सहा ते आठ महिन्यात पहिल्या टप्प्यात १२०० सीसीटीव्ही कॅमरे बसण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या, त्याचे लोकार्पण होत असून ऑक्टोबर २०१६ पर्यंत संपूर्ण मुंबई शहरात सीसीटीव्ही कॅमरे बसण्यात येतील. नागपुरात सीसीटीव्ही बसण्यासाठी डीपीआर तयार करण्यात येत आहे. अहवाल प्राप्त होताच एका वर्षांत संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवण्यात येतील, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याचा अर्थ काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्ताचा संदर्भ देत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सबुरीचा सल्ला दिला. मात्र, या सल्ल्याचे कारण काय, हे मात्र कळू शकले नाही. त्यामुळे याची कार्यक्रमस्थळीच चर्चा सुरू झाली. बावनकुळे यांनी त्यांच्या भाषणातून प्रसिद्धी माध्यमावर टीका केली होती. ही माध्यमे रंजक बातम्या येत असल्याने नागपूर जिल्ह्य़ाची बदमानी होते, असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांनी तो मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, प्रसिद्धी माध्यमांना २४ तास वृत्त द्यायचे असते. त्याबद्दल बावनकुळे यांनी फारसे वाईट वाटून घेऊ नये. आपण चांगले काम केल्यावर आपल्याला चांगली प्रसिद्धी देखील मिळेल. नागपूर हे नवीन ‘डेस्टिनेशन’ ठरत आहे. नकारात्मक प्रसिद्धीमुळे त्याच्यावर परिणाम होतो, हे खरे आहे. मात्र, माध्यमे आपले मित्र आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.