समितीच्या अहवालात त्रृटी दूर झाल्याचा दावा
महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाने नियुक्त केलेल्या सत्यशोधन समितीने शहराच्या तीन भागात वीज वितरण करणाऱ्या ‘एसएनडीएल’ फ्रेंचायझीच्या सेवा संबंधीत त्रृटी जवळपास दूर झाल्याचा अहवाल महावितरणला दोन दिवसांपूर्वी सादर केला आहे. याप्रसंगी महावितरणला एसएनडीएलचे सगळे हिशेब तपासून अंकेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनीच पार पाडल्याचे सूचित केले गेले आहे. तेव्हा उर्जामंत्री ‘एसएनडीएल’च्या लेखा परिक्षणाचे काम महावितरण वा निष्पक्ष एजेंसीकडून करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या महाल, सिव्हिल लाईन्स, गांधीबाग या तीन विभागातील साडेचार लाख वीज ग्राहकांना वीज वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडून ‘एसएनडीएल’ या खाजगी फ्रेंचायझीकडे देण्यात आली आहे. ‘एसएनडीएल’च्या विरोधात त्यांच्या हद्दीतील वीज ग्राहकांच्या वेगवेगळ्या वाढणाऱ्या तक्रारी बघता काही महिन्यांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी तीन सदस्यीय सत्यशोधन समितीकडून चौकशीचा निर्णय घेतला होता. आर. बी. गोयनका, गौरी चंद्रायान, एस. एम. मडावी यांच्या समितीने चौकशी करून फ्रेंचायझीच्या अनेक त्रृटी व अनियमितता शोधून काढल्या. त्यावरून महावितरणने ७ सप्टेंबरला दोन महिन्यात त्रुटी दूर करण्याची नोटीस फ्रेंचायझीला बजावली.त्यानंतर ९० टक्के त्रृटी दूर केल्याचा अहवाल एसएनडीएलकडून महावितरणला देण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान प्रसिद्धीमाध्यमांना दिली होती. या नोटीसीला तीन महिने झाले असताना एक महिन्याची पुन्हा मुदतवाढ दिल्याने नागपूरकर आश्चर्य व्यक्त करीत होते. त्यातच अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ात उर्जामंत्र्यांनी एसएनडीएलला सगळ्या त्रृटी दूर करण्याच्या सूचना केल्या असून त्याचे अंकेक्षण सत्यशोधन समितीकडून पुन्हा केले जाणार असल्याचे सांगितले होते.
सत्य शोधन समितीने नुकतेच एसएनडीएलच्या सेवा संबंधीत तक्रारीचे अंकेक्षण पूर्ण करून तसा अहवाल महावितरणकडे सादर केला आहे. सोबत अहवालात एसएनडीएलचे वेगवेगळे लेखे, ग्राहकांकडून घेण्यात आलेले सुरक्षा ठेवीसह विविध खाते महावितरणकडे तज्ज्ञ असल्याने त्यांनीच तपासण्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘चांगल्या सेवेची पावती’
‘एसएनडीएल’ प्रशासनाकडे सत्यशोधन समितीच्या अंतिम अहवालाबाबत कोणतीही माहिती नाही. परंतु समितीने सेवा संबंधीत त्रृटी दूर झाल्याचे अहवालात नमूद केले असल्यास ती फ्रेंचायझीच्या चांगल्या सेवेची पावती आहे. ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याकरिता फ्रेंचायझी कटीबद्ध आहे. फ्रेंचायझीचे लेखेही पारदर्शी असून, ते तपासणीनंतर पुढे येईल, असे मत एसएनडीएलच्या जनसंपर्क विभागाने व्यक्त केले.