मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग यावेत -अशोक चव्हाण
उद्योगसमूहांबरोबर केवळ सामंजस्य करार करून ‘मेक इन महाराष्ट्र’ होणार नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातील मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग यायला हवेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. नागपुरात रवी भवनात ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी महाराष्ट्र सरकारचा रेमंड्स, स्टरलाइट, कोकाकोला या उद्योगसमूहांबरोबर सामंजस्य करार झाला. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, सामंजस्य करार होणे आणि प्रत्यक्षात उद्योग उभारणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ‘मेक इन इंडिया’चे आम्ही स्वागत करतो, पण उद्योगांची ही परिषद सामंजस्य करारापुरती राहू नये. राज्यातील मागास जिल्ह्य़ांमध्ये उद्योग सुरू व्हावेत.
भुजबळ कुटुंबीय आणि इतर लोकांवर झालेल्या कारवाईबद्दल ते म्हणाले, राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी द्वेषबुद्धीने, सूडबुद्धीने कारवाई होत आहे. विरोधकच राहू नयेत, ही व्यवस्था त्यांनी सुरू केली आहे. लोकशाहीत अशा गोष्टी चालत नसतात. उलट विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर शासनाने लोकहितार्थ निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यात दुष्काळाची तीव्रता आहे; महागाई, बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात आहे, त्यावर विरोधी पक्षाने बोलायचे नाही का? विरोधकांना गप्प करण्यासाठी चालवलेला हा खेळ आहे.
अशा कारवाईमुळे विरोधक गुपचूप बसतील व शासनाच्या विरोधात काहीच बोलणार नाही, अशी यांची अपेक्षा असेल तर आम्ही त्याला जुमानणार नाही.