शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकलेल्या वाघिणींच्या बछडय़ांचे भवितव्य म्हणजे प्राणिसंग्रहालातील कायमचा बंदिवास, असाच आजवरचा शिरस्ता राहिलेला आहे. वाघिणीपासून दुरावलेल्या या बछडय़ांना जंगलात सोडण्याच्या दृष्टीने वनाधिकाऱ्यांनी कधी प्रयत्नच केला नाही. राज्यातील पहिला प्रयोग पेंच व्याघ्र प्रकल्पातील खुल्या पिंजऱ्यातील वाघिणीसंदर्भात होणार होता, पण तोही अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे रखडला. अनाथ बछडय़ांचे भवितव्य पुन्हा पिंजऱ्यात बंदिस्त होऊ नये म्हणून या परिस्थितीला हाताळण्यासाठी कायमस्वरूपी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्यातील जंगलात आजवर अनेक ठिकाणी कधी शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकल्याने, तर कधी मानव-वन्यजीव संघर्षांतून वाघिणीच्या मृत्यूनंतर बछडय़ांवर अनाथ होण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशसारख्या राज्यात या अनाथ बछडय़ांचे संगोपन करून तेथील वनखात्याने त्यांना मूळ अधिवासात यशस्वीरीत्या सोडले.उपराजधानीतील महाराजबाग प्राणिसंग्रहालयाने अनेक बछडय़ांना आधार दिला आहे. मध्य चांदा वनविभागातील पेंच व्याघ्र प्रकल्पात ठेवलेल्या टीएफ-१ आणि टीएफ-२ या वाघिणींसंदर्भात वन्यजीवप्रेमींच्या आग्रहाखातर हा प्रयोग राबवण्याचे ठरले, पण अधिकाऱ्यांची नकारात्मकता भोवली आणि प्रयोग अयशस्वी ठरला. मात्र, उशिरा का होईना राज्याच्या वनखात्याला जाग आली आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या अशी परिस्थिती तातडीने हाताळण्यासाठी कायमस्वरूपी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली.
राज्यातील जंगलात अशी घटना घडल्यास ही समिती त्वरित घटनास्थळावर जाऊन पाहणी करेल तसेच अनाथ बछडय़ासंदर्भात तातडीची व दुरगामी व्यवस्था करण्यासाठी पाहणी करून राज्याच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना अहवाल सादर करेल. वाघिणीचे अस्तित्व आढळले नाही, तर बछडय़ांना कुठे ठेवायचे, त्यांना जंगलात मुक्त करण्यासाठी काय प्रशिक्षण द्यायचे, प्राणीसंग्रहालयात ठेवायचे का, या सर्व गोष्टींचा निर्णय या समितीच्या अहवालावरून घेण्यात येईल. प्रशिक्षणाबाबत निश्चिती झाल्यास प्रशिक्षण कुठे द्यायचे, किती दिवसात आणि कुठे मुक्त करायचे, याचे अधिकार या समितीकडे असतील.

अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व नागपूर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष, तर सदस्य म्हणून नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दक्षिणकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए.डी. खोलकुटे, विभागीय वनाधिकारी गिरीश वशिष्ट, सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे, मानद वन्यजीव रक्षक व ज्येष्ठ वन्यजीवतज्ज्ञ कुंदन हाते यांचा या समितीत समावेश आहे.