संघनिष्ठ बंडखोरांनाही जबाबदारी देणार

महापालिकेत तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाच्या शहर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी निवडून आले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीतील पराभूत झालेल्या काही वरिष्ठ सदस्यांची नियुक्ती केली जात आहे. यासोबतच बंडखोरी केलेल्या काही संघनिष्ठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षातंर्गत जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडे इच्छुकांची  संख्या मोठी होती. त्यातील काही कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. जवळपास ६५ कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. उमेदवारी दिलेले पक्षाचे अनेक ज्येष्ठ सदस्य पराभूत झाले. त्यांच्यावर पक्षातंर्गत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. प्रभाग क्रमांक १८ मधून पराभूत झालेले माजी स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत यांच्याकडे मध्य नागपूरचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी कृष्णा कावळे यांच्याकडे मध्य नागपूरचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी असताना त्या जागेवर राऊत यांची निवड केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक असलेल्या राऊत यांच्याकडे कुठलीतरी जबाबदारी देणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांची प्रथम नियुक्ती करण्यात आली. कावळे यांना पायउतार व्हावे लागले. याशिवाय दक्षिण नागपुरातील पक्षाचे पदाधिकारी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडे शहराचे महामंत्री म्हणून जबाबदारी देण्याचे जवळपास निश्चित झाले असून त्या संदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे.

बंडखोरी केलेल्यांना पक्षात स्थान नसल्याचे शहर अध्यक्षांनी जाहीर केले असले तरी त्यातील काहींनी संघाच्या माध्यमातून पक्षातील प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  श्रीपाद रिसालदार, प्रसन्न पातुरकर, सुनील श्रीवास, शिरीष पुरोहित यांचा त्यात समावेश आहे. बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्यास पक्षातील एका गटाने विरोध केल्याने संघाच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. २०१९ मध्ये लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत. लोकसभा निवडणुकीला दोन वर्षांचा कार्यकाळ असला तरी शहरात संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. पक्षातील आणि संघनिष्ठ असलेल्या बंडखोरांना बाहेर ठेवून चालणार नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.  पक्षामध्ये ‘एक पद एक व्यक्ती’ या प्रमाणे शहराची कार्यकारिणी राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुकीत अनेक पदाधिकारी आणि आघाडीचे प्रमुख निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरात तीन महामंत्री असून त्यातील संदीप जोशी यांच्याकडे सत्तापक्ष तर दुसरे महामंत्री संदीप जाधव यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद आहे. हे दोन्ही प्रमुख कार्यकर्ते पक्षासाठी वेळ देऊ शकणार नाहीत, त्यामुळे त्यांच्याजागी पराभूत झालेल्या पक्षातील ज्येष्ठ सदस्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष नंदा जिचकार यांची महापौर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या जागी नीता ठाकरे किंवा कल्पना पांडे यांची नावे चर्चेत आहेत.

शहराच्या कार्यकारिणीतील अनेक पदाधिकाऱ्यांना महापालिकेत वेगवेगळी पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता नव्या कार्यकर्त्यांची निवड केली जाणार असून काही बदल केले जाणार आहेत. मध्य नागपूरच्या अध्यक्षपदी बंडू राऊत यांची नियुक्ती करण्यात आली असली तरी येणाऱ्या काही दिवसात कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात येणार आहे. कोणाला घ्यावे आणि कोणाला नाही, याबाबत कोअर कमिटीच्या सदस्यांमध्ये चर्चा केली जाईल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या संदर्भात निर्णय घेतील.

सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष भाजप.