निखिल चौधरी हा व्यवसायाने संगणक अभियंता असलेला तरुण. एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करणारा. येथील न्यू इंग्लिश शाळेचा विद्यार्थी. या शाळेतील ३० माजी विद्यार्थ्यांचा एक गट आहे. दरवर्षी दिवाळीत एकत्र येणारे हे उच्चशिक्षित तरुण समाजासाठी काही तरी चांगले करायचे, या भावनेतून धडपडत असतात. यावेळी निखिल व त्याचा मित्र सुशील गायकवाडने माणुसकीच्या भिंतीची संकल्पना सर्वासमोर मांडली. लोकांनी त्यांच्याकडील जुने कपडे या भिंतीजवळ आणून ठेवायचे व ज्याला गरज असेल त्याने ते घेऊन जायचे. सध्या कोल्हापुरात असलेल्या निखिलला तेथे अशी भिंत दिसली. तीच संकल्पना त्याने नागपुरात राबवायचे ठरवले व येथील शनी मंदिराजवळ ही भिंत आकाराला आली. माध्यमांनी या भिंतीचे खूप कौतुक केले. प्रसिद्धी मिळाल्याने ही भिंत अनेकांच्या घरात पोहोचली आणि भिंतीजवळ कपडय़ांचा ढीग साचू लागला. आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना असणारा मोठा वर्ग आहे. मात्र, अनेकदा हे देणे द्यायचे कसे, हेच अनेकांना कळत नाही. अशा स्थितीत कुणी नवी संकल्पना अंमलात आणली की, देणाऱ्यांचे हजारो हात आपसूकच समोर येतात. तसेच या भिंतीच्या बाबतीत झाले.

एखाद्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची नक्कल करणारे सुद्धा समाजात असतात. ही नक्कल चांगल्या भावनेने करणे वेगळे व केवळ प्रसिद्धीसाठी करणे वेगळे. समाजात असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. त्यामुळे निखिल व सुशीलच्या रायलो फाऊंडेशनने उभारलेल्या भिंतीचे सर्वत्र कौतुक होताच नागपुरात ठिकठिकाणी अशा भिंती तयार झाल्या. अनेकांनी ही संकल्पना उचलून भिंत रंगवली. काहींनी त्याला ‘नेकी की दिवार’ असे नाव दिले, तर काहींनी ‘वॉल ऑफ ह्य़ुमॅनिटी’ असे म्हटले. आजमितीला उपराजधानीत अशा पन्नास भिंती ठिकठिकाणी तयार झाल्या आहेत. चांगल्या हेतूने कुणी दातृत्वाची भावना जोपासत असेल, तर त्यात कुणाला गैर वाटून घेण्याचे काही कारण नाही, पण केवळ सेवेचा आव आणण्यासाठी अशा भिंती उभारल्या जात असतील, तर ते गैर आहे व चांगल्या समाजस्वास्थ्याचे लक्षण नाही. या ५० पैकी अनेक भिंतींजवळ दान केलेले कपडे अस्ताव्यस्त पडलेले असतात. त्याचे वर्गीकरण सुद्धा नीट केलेले नसते. हे कचराघर नाही, चांगल्या भावनेने व गरजूंना मोफत कपडे मिळावे म्हणून तयार केलेले कपडाघर आहे, याचा विसर या भिंती उभारणाऱ्या संयोजकांना पडलेला आहे. निखिल, सुशील व त्याच्या मित्रांनी जेव्हा पहिली भिंत उभारली तेव्हा त्यांनाही थोडा त्रास झाला. जुने कपडे विकणारे काही फेरीवाले या भिंतीजवळ यायचे, गरजू आहे, असे भासवायचे व कपडे उचलून न्यायचे, नंतर ते आपल्या हातगाडीवर विकायचे. हे लक्षात आल्यावर या तरुणांनी फेरीवाल्यांची समजूत काढली व हा प्रकार बंद झाला. गरजूंच्या नावावर स्वार्थ साधणाऱ्या अशा लोकांना या उपक्रमापासून दूर ठेवता यावे म्हणून मग शनी मंदिराच्या भिंतीजवळ या तरुणांनी एक चौकीदार ठेवला. आता तो लक्ष ठेवून असतो. या चौकीदाराच्या वेतनाचा खर्च हे तरुण स्वत:च्या खिशातून करतात. दुर्दैवाने इतर भिंतीच्या बाबतीत अशी काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे तेथे केवळ कपडे टाकणारे व ते उचलून नेणारे एवढाच व्यवहार शिल्लक उरला आहे.

या संकल्पनेतील माणुसकीचा झरा मात्र आटला आहे. अपवाद फक्त बजाजनगरात मातृसेवा संघाच्या समाजकार्य महाविद्यालयाने सुरू केलेल्या भिंतीचा. ज्यांच्याकडे जास्त आहे त्याने ते द्यावे व ज्याला गरज आहे त्याने ते घेऊन जावे, अशी भावनेला हात घालणारी ओळ या भिंतीवर आहे व तेथे लक्ष ठेवण्यासाठी विद्यार्थीच आळीपाळीने बसतात. या भिंतींमुळे समाजातील वेगवेगळी रूपे सुद्धा आयोजकांना बघायला मिळत आहेत. अनेक लोक दान करताना फाटलेले, कुणीही घालू शकणार नाही, असे कपडे आणून देतात. काही लोक त्यांच्याकडे अडगळीत पडलेली अंतर्वस्त्रे आणून देतात. आजही अनेक घरांमध्ये जुने कपडे एकत्र बांधून ठेवण्याची प्रथा आहे. आधी हे कपडय़ांचे गठ्ठे बोहरणीची वाट बघत अडगळीत पडलेले असायचे. आता नव्या रचनेत ही बोहरीणच हद्दपार झालेली आहे. त्यामुळे या गठ्ठय़ांचे काय करायचे, असा प्रश्न पडलेली कुटुंबे तेच गाठोडे थेट या भिंतीपाशी आणून सोडत आहेत. दान करण्याचेही काही संकेत असतात, याचा विसर अनेकांना पडल्याचा अनुभव या भिंती घेत आहेत. काही लोक मात्र कपडे व्यवस्थित घडी करून, तर कुणी प्रेस करून आणून देतात. काहीजण कपडय़ांचे वर्गीकरण घरीच करतात. लहान मुलांचे वेगळे, मोठय़ांचे व मुलांचे वेगळे, असे स्वतंत्रपणे आणून देतात. ज्या गरजूंना हे कपडे मिळणार आहेत, त्यांना ते व्यवस्थित वापरता आले पाहिजे, असा विचार त्यामागे असतो. दान करावे, गरजूंना मदत करावी, असे मनात असणारे अनेकजण समाजात असतात, पण ते करण्याची पद्धत अनेकांना ठावूक नसते. त्यातून हे असे गठ्ठे आणून टाकण्याचे प्रकार घडतात.

तशी ही माणुसकीच्या भिंतीची कल्पना जुनी. युद्धग्रस्त भागात सर्वस्व गमावून बसलेल्या लोकांना मदत करता यावी म्हणून ही भिंत पहिल्यांदा तयार झाली. समाजमाध्यमातून ही भिंत जगभरात पोहोचली व गरजूंना मदतीचा ओघ सुरू झाला. आजही जगभरातील अनेक हात या भिंतीला सजवण्यात गुंतलेले आहेत. नागपुरातील उच्चशिक्षित तरुणांनी ही भिंत शहरात आणली. तिचे स्वागत झाले, पण त्याची नक्कल करण्याच्या नादात या भिंतीमागील माणुसकीच्या भावनेला तडे जायला लागले, ही खेदाची बाब आहे. नुसता आव आणून समाजसेवा होत नाही. त्यामागची भावनाही तेवढीच निर्मळ असावी लागते. अशा संकल्पना राबवताना त्यासाठी वेळ देण्याची तयारी असली पाहिजे. तेच जर होत नसेल, तर केवळ भिंतीची संख्या वाढेल, पण त्यातील माणुसकी हळूहळू हरवत जाईल, हे नक्कल करणाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

devendra.gawande@expressindia.com