वाहतूक कोंडीचा फटका, पालकांचा राडा
अखिल भारतीय पातळीवर वैद्यकीय विद्या शाखांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता-प्रवेश चाचणीला (नीट) रविवारी वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास काही मिनिटे उशीर झाल्याने शहरातील विविध परीक्षा केंद्रावर शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांना पुन्हा एकदा परीक्षेला मुकावे लागले. दरम्यान, ‘नीट’चा पेपर फुटल्याची चर्चा परीक्षा केंद्रांवर होती. मात्र, त्याबाबत माहिती मिळाली नाही.
रविवारी दुसऱ्यांदा ‘नीट’ शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. त्यामुळे मेडिकल प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी गमवावी लागल्याने परीक्षा केंद्रांवर पालकांनी चांगलाच राडा केला. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील सात केंद्रांवर ‘नीट’ घेण्यात आली. यात विदर्भ आणि मराठवाडा मिळून केवळ एकच केंद्र देण्यात आले होते. त्यामुळे बीड, उस्मानाबाद ,अमरावती, यवतमाळ आदी विविध भागातील विद्यार्थी परीक्षेला आले होते. सकाळी १० दुपारी १ ही परीक्षेची वेळ होती. त्यासाठी सकाळी ७.३० ते ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यासाठी बहुसंख्य विद्यार्थी वेळेत केंद्रांवर पोहोचले. मात्र, बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास १० ते १५ मिनिटे उशीर झाला. या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यात वर्धमाननगर येथील सेंटर पॉइंट स्कूल, हरिकिशन पब्लिक स्कूल, श्रीकृष्णनगरनधील भवन्स विद्या मंदिर येथील परीक्षा केंद्रांतही १० ते १२ बाहेरगावचे विद्यार्थी वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे त्यांना बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश नाकारण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी शाळा प्रशासनाकडे विनंती करूनही त्याचा उपयोग झाला नाही. शहरातील वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र शोधणेही कठीण झाल्याने उशीर झाला, असे अनेक पालकांनी सांगितले. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने अनेक विद्याथ्यार्ंना गहीवरून आले. वर्षभर मेहनत करूनही परीक्षा देत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची परिस्थिीत बघून पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे विनंती केली. मात्र, केंद्रावर शाळा व्यवस्थापनाने काहीच ऐकले नाही त्यांना तेथून जाण्यास सांगितल्यावर पालक संतापले. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सेंटर पॉइंट स्कूल, भवन्स विद्या मंदिर शाळेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.