भाजपचे आ.आशीष देशमुखांनी पाठविले पत्र

नागपुरात १४ डिसेंबरला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघणारा राज्यस्तरीय मराठा-कुणबी मूकमोर्चा यशस्वी व्हावा, यासाठी सर्वपक्षीय मराठा-कुणबी आमदार सक्रिय झाले आहेत. भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनीही यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी दोन्ही सभागृहातील समाजाच्या १३२ पेक्षा अधिक सदस्यांना पत्र पाठवून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी येत्या ७ डिसेंबरला एका मेजवानीचेही आयोजन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, शेतमालाला योग्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी यापूर्वी राज्यभर निघालेल्या मराठा मूकमोर्चांमुळे राज्यात भगवे वादळ निर्माण झाले होते. त्याचे राज्याच्या राजकीय पटलावरही प्रतिबिंब उमटले होते. मोर्चाला होणारी लाखोंची गर्दी आणि पाळली जाणारी शिस्त यामुळे ते लक्षवेधी ठरले होते. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात या मोर्चाला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या तुलनेत नागपूरमध्ये ऑक्टोबरमध्ये निघालेल्या जिल्हास्तरीय मोर्चाला मात्र थंड प्रतिसाद मिळाला होता. मराठा विरुद्ध कुणबी वाद पेटवून भाजपनेच या मोर्चातील हवा काढून घेतली, असे आरोपही झाले. आता अधिवेशनाच्या काळात पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन करण्याच्या हेतूने १४ डिसेंबरला राज्यस्तरीय मोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे. सकल मराठा-कुणबी मूकमोर्चा या नावाने हा मोर्चा निघणार आहे. तो यशस्वी व्हावा म्हणून राज्यभर ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू आहे. नागपुरात संपर्क कार्यालय उघडण्यात आले असून प्रचार आणि प्रसारासाठी रथ तयार करण्यात आला आहे. समाजाचे सर्वपक्षीय आमदार सुद्धा सक्रिय झाले आहेत. भाजपचे काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी विधानसभा आणि विधान परिषदेतील समाजाच्या आमदारांना पत्रे पाठवून त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ७ डिसेंबरला त्यांच्यासाठी एका मेजवानीचेही आयोजन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व आमदार शहरातच उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेजवानीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीवर आरोप, भाजपही सक्रिय

मराठा मोर्चाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असा आरोप भाजप आणि शिवसेनेचे नेते आतापर्यंत करीत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राष्ट्रवादीचे नाव न घेता त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या गृहशहरात निघणाऱ्या मराठा मोर्चासाठी खुद्द भाजप आमदार आशीष देशमुखच सक्रिय झाले आहेत.