नागपुरात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ; गेल्या तीन महिन्यांत खुनाच्या २३ घटना

नागपूरच्या ग्रामीण भागातील कन्हान येथील एका सराफा व्यापाऱ्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून लुटले. यात व्यापाऱ्याला गोळी लागली. तो गंभीर जखमी झाला. अद्यापही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. ही घटना नागपूरच्या ग्रामीण भागातील असली तरी पुन्हा एकदा नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. गेल्या तीन महिन्यांत नागपुरात खुनाच्या २३ घटना घडल्या असून गंभीर गुन्ह्य़ांच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करणाऱ्या सरकारला आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे कमी करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे.

नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघही शहरातील. मुख्यमंत्री वा गृहमंत्र्यांच्या शहरातील गुन्हेगारीवर वचक बसावा किंवा आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण गेल्या अडीच वर्षांत फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून नागपुरातील गुन्हेगारी कमी झालेली नाही वा गुन्हेगारीचा आलेख चढता राहिला आहे. नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल विरोधकांनी विधिमंडळातही अनेकदा आवाज उठविला, पण फारसा फरक पडलेला दिसत नाही. नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारीवरून टीकेचे धनी व्हावे लागल्याने मुख्यमंत्र्यांनी नागपूर पोलिसांत बदल केले. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नेमले.  मुंबईनंतर सर्वाधिक आयपीएस नागपुरात असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा दबाव असतो. तरीही गुन्हेगारीवर नियंत्रण पोलीस यंत्रणांना आणता आलेले नाही.

अमित हरिशंकर गुप्ता यांच्या मालकीचे कन्हान येथे अमित ज्वेलर्स या नावाचे सोन्या-चांदीच्या दागिन्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते रविवार, २१ मे ला त्यांच्या दुकानात बसले असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास दोन काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरील चार व्यक्ती त्यांच्या दुकानात शिरले. त्यांनी चेहऱ्यावर कापडाने झाकले होते. बंदुकीचा धाक दाखवून दागिन्यांसह गल्ल्यातील रकमेची मागणी त्यांनी केली. या घटनेमुळे दुकानातील कर्मचारी घाबरले, पण मालक अमितने प्रतिकार करताच लुटारूंनी त्यांच्यावर गोळीबार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्य़ातील ही घटना हादरविणारी आहे. परंतु रविवारच्या घटनेनंतर आकडेवारीवर नजर टाकली असता गंभीर गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी होण्याऐवजी त्यांच्यात वाढच नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च २०१७ मध्ये एकूण २३ खुनांच्या घटना घडल्या. त्यापैकी २२ खून उघड करण्यात यश आले असून एका खुनाच्या घटनेतील मारेकरी अद्याप सापडू शकले नाहीत. मागील वर्षी याच कालखंडात एकूण १८ खुनाच्या घटना घडल्या होत्या. यावरून यंदा खुनाच्या पाच घटना अधिक घडल्या आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत बलात्काराच्या ४२ घटना उघडकीस आल्या असून मागील वर्षांच्या तुलनेत त्यात १०ने अधिक आहेत. चोरीच्या ७७६, जबरी चोरीच्या ७६, अपहरणाच्या ११९ घडना घडल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यात अनुक्रमे १२, २३ आणि १६ने वाढ नोंदविण्यात आली. या कालखंडात भाग १ ते ५ मध्ये येणाऱ्या गंभीर स्वरूपाचे एकूण २ हजार ३५१ गुन्हे घडले आहेत. एकूण आकडेवारी सादर करून शहरात गुन्ह्य़ाचे प्रमाण कमी झाले, असा दावा करणाऱ्या सरकारने गंभीर गुन्ह्य़ांच्या वाढत्या प्रमाणाकडे लक्ष घालण्याची गरज आहे.

ज्येष्ठ नागरिकही असुरक्षित

एकूण खुनांच्या घटनांपैकी पाच खून ज्येष्ठांचे आहेत. यावरून ज्येष्ठ नागरिक लक्ष्य ठरत असून त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. एकटे राहणाऱ्या सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांची नोंद मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आहे, हे विशेष.

untitled-18

untitled-19