देशात विमान प्रशिक्षणात अग्रक्रमावर असलेल्या गोंदिया येथील ‘राष्ट्रीय उडान प्रशिक्षण संस्थे’च्या (एनएफटीआय) अत्याधुनिक म्हणून ओळख असलेल्या दोन इंजिनच्या विमानाला झालेला अपघात एकूणच वैमानिक प्रशिक्षण संस्थांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री असताना त्यांनी त्यांच्या गोंदिया या मतदारसंघात विमान प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

अपघातग्रस्त डायमंड डी ए४२ विमान हे अत्याधुनिक होते. या विमानाला सहजासहजी अपघात होत नसतो. त्यामुळे डीए-४२चा अपघात एकूण प्रशिक्षणाची पद्धत आणि विमानांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. या संस्थेतील अभ्यासक्रम, प्रशिक्षणाची पद्धत आणि अपघात टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनेचा हा घेतलेला मागोवा.

गोंदियाजवळील बिरसी विमातळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्र आहे. नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट आणि भारतीय विमान प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत आहे. एनएफआयटी ही खासगी कंपनी आहे. या केंद्राची स्थापना २००७ मध्ये झाली. तेव्हापासून सुमारे २५० वैमानिक तयार झाले आहेत. सध्या केंद्रात १५० हून अधिक प्रशिक्षणार्थी आणि १० हून अधिक प्रशिक्षक आहेत.

  • गोंदिया एनएफटीआय येथे वाणिज्यिक वैमानिक परवाना (सीपीएल) हा १९ महिन्यांचा अभ्यासक्रम आहे. त्याअंतर्गत अत्याधुनिक विमाने चालवण्यास दिली जाते. यामध्ये डायमंड डीए४० आणि डीए४२ विमानांचा समावेश आहे. तसेच अत्याधुनिक सिम्युलेटर उपकरणे आहेत. येथे उच्च दर्जाचे प्रशिक्षण प्राप्त प्रशिक्षक आहेत. अपघातग्रस्त विमानात हवाई दलाचे मिग विमान चालण्याचा अनुभव असलेले प्रशिक्षक होते.
  • विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यासाठी जमिनीवरील कुठल्याही वस्तूंपासून सुमारे ५०० फुटांवरून विमान उडायला हवे. परंतु या प्रकरणात सुमारे १०० फुटांवर हे विमान उडत होते. एक इंजिन नादुरुस्त असल्यास दुसऱ्या इंजिनच्या मदतीने इमर्जन्सी लॅिण्डग केले जाते. एवढय़ा कमी उंचीवर विमान का उडवले जात होते आणि विमानात काही बिघाड असल्याने वैमानिकाने एटीसीला संदेश का दिला नाही? याचा शोध घेण्यात येत असून यानिमित्ताने प्रशिक्षणाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
  • प्रशिक्षण केंद्रात बारावीतील गणित आणि भौतिकशास्त्र विषयातील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. यासाठी किमान वय १८ वर्षे असावे लागते. बिरसी येथे दोन प्रकारचे अभ्यासक्रम चालवण्यात येतात त्यात एनएफटीआय आणि इंडिगोचा कंपनीच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. एनएफटीआयच्या प्रशिक्षणासाठी ४० लाख रुपये आणि इंडिगोच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी ६० लाख रुपये शुल्क आहे. हे अभ्यासक्रम दीड ते दोन वर्षांचे आहेत.

अपघाताची मालिका

  • प्रशिक्षणार्थी विमान २०१० मध्ये मध्य प्रदेशातील लांजी येथे आपातकालिन लँडिंग करताना क्षतिग्रस्त झाले.
  • १८ मार्च २०१३ ला प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीबाहेर गेले आणि एका वाहनाला जाऊ धडकले.
  • २४ डिसेंबर २०१३ ला बिरसी येथून उडालेले विमान मध्य प्रदेशातील पचमढी परिसरात पडले. त्यात वैमानिक सोहेल अंसारी यांचा मृत्यू झाला. हे विमान रायबरेली येथील प्रशिक्षण संस्थेचे होते.
  • दीड महिन्यापूर्वी बिरसी येथे दोन प्रशिक्षणार्थीचा आकस्मिक मृत्यू झाला होता.
  • २६ एप्रिल २०१७ ला महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमेवर वैनगंगा नदीच्या पात्रात विमान पडून प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाला.

शेवटच्या तासात घात

प्रशिक्षण घेत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या दिल्ली येथील हिमानी कल्याण हिचा प्रशिक्षणाचा शेवटच्या सत्रातील शेवटच्या तासातील उडान होते. या उडानानंतर ती व्यावसायिक वैमानिक होणारी होती. व्यावसायिक वैमानिक  म्हणून दर्जा प्राप्त करण्यासाठी स्वतंत्रपणे २००तास विमानोड्डाणाचा अनुभव असणे गरजेचे आहे. दरम्यान या विमानात ‘ब्लॅक बॉक्स’ नसल्याने या अपघाताची चौकशी करताना वैमानिकाने अखेरच्या क्षणी एटीसीसोबत साधलेल्या संवादावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.